मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
दहिसर मधील चांडक निश्चय संकुलातील निश्चय सखी मंचच्या वतीने रविवार, दिनांक २३ ऑगस्ट रोजी मंगळागौरीचा सण मोठ्या गुण्यागोविंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. मंचाचे हे चौथे वर्ष असून, महिलांनी एकत्र येऊन आपली संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला.
या सोहळ्यासाठी सख्यांनी पारंपरिक वेशभूषेला पसंती दिली होती. नऊवारी साड्या, नाकात नथ, पारंपरिक दागिने आणि केसात माळलेला मोगऱ्याचा गजरा किंवा गुलाबाचे फूल यामुळे वातावरणात एक वेगळाच टवटवीतपणा जाणवत होता . मंगळागौरीच्या पूजेसाठी अतिशय देखणी मांडणी करण्यात आली होती. कलश, नारळ, विविध प्रकारची फळे (सफरचंद, डाळिंब, सीताफळ), विड्याची पाने,पत्री,16 झाडांची पाने ,फुले आणि दीप प्रज्वलित करून विधिवत पूजा करण्यात आली. पूजेच्या भोवती काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्यांनी कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली होती .
यावेळी मंचाच्या सख्यांनी विधीवत पूजा करून परंपरेचा जागर केला. कार्यक्रमादरम्यान शिक्षिका सौ मानसी मनोज संखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. "महाराष्ट्राची ही समृद्ध संस्कृती आणि परंपरा आपणच जपली पाहिजे. सणांच्या निमित्ताने महिलांनी रोजच्या धावपळीतून स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. घराबाहेर पडून अशा प्रकारे एकत्र आल्याने केवळ आनंदच मिळत नाही, तर एकमेकींना पाठबळही मिळते," असे विचार त्यांनी मांडले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंचाच्या अनेक सख्यांनी विशेष परिश्रम घेतले.सौ मानसी संखे यांनी काही सख्यांच्या मदतीने पारंपरिक खेळांसोबतच आधुनिक खेळांची सांगड घातली.पूजा,आरती,नवविवाहितेची ओटी,हळदीकुंकू,फुगड्या,उखाणे आणि नृत्य यांनी वातावरण मराठमोळे बनले होते.दंड फुगडी,बस फुगडी,सासू सुनांचे खेळ, चिडविणे ,हास्याचा कल्लोळ असे अनेक मजेशीर प्रसंग सर्वांनी अनुभवले.विविध वयोगटानुसार 70 वर्ष ते अगदी लहान 5 वर्षाच्या मुलींपर्यंत सर्वांनी विविध गाण्यांवर ठेका धरला. कार्यक्रमाचे सांगता एकत्र स्नेहभोजनाने झाली. आधुनिक काळातील जीवनशैली आणि जुन्या परंपरा यांचा सुरेख संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला. सामूहिक रित्या संपन्न झालेल्या या सोहळ्यामुळे सखी मंचाच्या सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

