पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
कर्तव्यात तत्पर असल्यामुळे रक्षाबंधनाला घरी जाऊ न शकलेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी 'जिल्हा पर्यावरण गतिविधि' व 'वरद सृष्टी इको फाउंडेशन'च्या वतीने एक अनोखा रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
या वर्षी ध्रुव मकरंद बडवे, वरद आणि सृष्टी बडवे यांनी पंढरपूर येथील कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना—विशेषतः नगरपालिका आणि पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना—राख्या बांधून त्यांच्या आयुष्यात बहिणीची कमतरता भासू दिली नाही.
या भावुक क्षणी रक्षाबंधनाची पारंपरिक भेट किंवा पैसे स्वीकारण्याऐवजी एका उदात्त विचाराची मागणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांकडून मिळणारी भेटवस्तू व रक्कम आदराने नाकारत त्यांना विनंती करण्यात आली:
"बहिणीच्या आठवणीत कार्यालयाच्या वतीने एक रोपटे लावा आणि परिसर पर्यावरणपूरक बनवा. आपण आपल्या कार्यालयाला पर्यावरणपूरक बनवण्यासाठी कुंड्या आणि माती उपलब्ध करून दिल्यास, रोपे आम्ही स्वतः आणून देऊ."
सर्वांच्या हस्ते इनडोअर प्लांट्स (Indoor Plants) लावण्याचा हा प्रस्ताव कर्मचाऱ्यांनी आनंदाने स्वीकारला.
या नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रमाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रेमाने व आदराने स्वागत केले तसेच आपले कार्यालय हिरवेगार करण्याचे आश्वासन दिले. समाजात जिव्हाळ्याचे नाते दृढ करण्यासोबतच निसर्गाचे रक्षण करणारा हा कौतुकास्पद प्रयत्न खऱ्या अर्थाने समाजासाठी एक अनोखा आदर्श ठरला आहे.
सर्व अधिकारी वर्गाने या भाऊ-बहिणींना तसेच 'वरद सृष्टी इको फाउंडेशन'ला या पर्यावरणप्रेमी उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन दिले.

