भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे विविध शासकीय मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा राजश्री ताड यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी तलाठी कार्यालयाजवळ उपोषण सुरू केले आहे.
गावातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मोफत शासकीय अन्नधान्याचा लाभ, उत्पन्नाचे दाखले तसेच प्रलंबित फेरफार नोंदी यांसारख्या विविध प्रश्नांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन नागरिकांना न्याय द्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.
संबंधित मागण्यांची दखल घेऊन प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या उपोषणामुळे प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि आंदोलकांच्या मागण्यांवर काय निर्णय होतो, याकडे भाळवणीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

