मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
प्रशासकीय सेवेत अनेकदा प्रामाणिक आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांना राजकीय दबाव आणि वारंवार होणाऱ्या बदल्यांचा सामना करावा लागतो. महाराष्ट्रात IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत 25 बदल्या झाल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. मात्र, सध्या बदलीच्या बाबतीत मुंढेपेक्षाही कर्नाटक कॅडरच्या IPS अधिकारी डी. रूपा मौदगिल यांची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या 20 वर्षांच्या सेवाकाळात तब्बल 40 वेळा बदल्या झाल्या आहेत. म्हणजेच सरासरी कोणत्याही एका ठिकाणी त्या 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकल्या नाहीत.
वारंवार बदल्या होऊनही आपल्या कामाची शैली न बदलता भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीविरुद्ध कडक भूमिका घेणाऱ्या या धडाकेबाज महिला अधिकाऱ्याची कायमच चर्चा होताना पाहायला मिळते. डी. रूपा मौदगिल यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी केली त्यांनी पहिल्याच प्रयत्नांत ऑल इंडिया रँक 43 (AIR 43) मिळवून UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. उच्च रँक असूनही त्यांनी भारतीय पोलीस सेवेची (IPS) निवड केली. हैदराबाद येथील पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणादरम्यानही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पाचवा क्रमांक पटकावला होता.
मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारतींना अटक
डी. रूपा यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेली आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारी घटना म्हणजे त्यांनी मध्यप्रदेशात केलेली कारवाई. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी मध्य प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांना हुबळी (कर्नाटक) येथील एका खटल्याप्रकरणी अटक केली होती. एका बलाढ्य राजकीय नेत्याविरोधात अशी कठोर कारवाई करण्याचे धाडस त्यांनी दाखवले ज्यामुळे संपूर्ण देशात त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला.
आपल्या 20 वर्षांच्या सेवाकाळात डी. रूपा यांनी जिथे जिथे काम केले, तिथे गुन्हेगारांवर आणि भ्रष्ट यंत्रणेवर वचक बसवला. बंगळुरू कारागृहात पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) असताना, त्यांनी ए. आय. ए. डी. एम. के. (AIADMK) नेत्या व्ही. के. शशिकला यांना तुरुंगात मिळत असलेल्या व्हीआयपी सुविधांचा आणि लाचखोरीचा पर्दाफाश केला होता. त्यांनी अनेक माजी मंत्री तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई केली.

