मंगळवेढा प्रतिनिधी तेज न्यूज
मंगळवेढा येथे आज ऊस दर संघर्ष समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मागील वर्षी झालेल्या ऊस दर आंदोलनाच्या वेळी मंगळवेढा तालुक्यातील दामाजी, युटोपियन, भैरवनाथ आणि फॅबटेक या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना प्रति टन ₹३,००० ऊस दर देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या आश्वासनानुसार संबंधित कारखान्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण दर दिला आहे का, याचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
ज्या कारखान्यांनी लेखी आश्वासन देऊनही अद्याप शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे ऊस दर दिलेला नाही, त्या कारखान्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
तसेच आगामी पोळा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी ऊस बिलाचा दुसरा हप्ता प्रति टन ₹२०० प्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
पहिली उचल जाहीर केल्याशिवाय ऊस तोडणी नाही
येत्या गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी गाळप सुरू करण्यापूर्वी उसाची पहिली उचल जाहीर करावी, असे आवाहन ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले.
तसेच पहिली उचल जाहीर झाल्याशिवाय कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्याने आपल्या उसाला कोयता लावू नये, असा ठराव बैठकीत करण्यात आला. शेतकऱ्यांनी एकजुटीने हा निर्णय अंमलात आणावा, असे आवाहनही करण्यात आले.
दुष्काळी परिस्थिती आणि म्हैसाळच्या पाण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
मंगळवेढा तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या पिकांना आणि जनावरांना पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात सोडण्यात यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या ऊस दराचा प्रश्न, थकीत ऊस बिले, आगामी गाळप हंगामातील पहिली उचल, दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याचा प्रश्न याबाबत ऊस दर संघर्ष समिती यापुढेही आक्रमक भूमिका घेणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस ऊस दर संघर्ष समितीचे दीपक भोसले, सचिन पाटील, निवास नागणे, राहुल घुले, श्रीमंत केदार, संगमेश केदार, बाळासाहेब बोबडे यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

