विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन,देशभक्तिपर कार्यक्रम आणि गुणवंतांचा गौरव;
मान्यवरांकडून विविध बक्षिसांची घोषणा..
शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज
यशोदा प्रतिष्ठान,शेळवे संचलित सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,शेळवे येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन,कवायत,देशभक्तिपर गीते, नृत्याविष्कार व विविध प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.
ध्वजारोहण समारंभासाठी अलिषा अजित यलमार (कंडरे), कंडरे डेव्हलपर्स, मुंबई या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या,तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओम लाईट हाऊस,पंढरपूरचे युवा उद्योजक विजय उर्फ बापूसाहेब देशमुख होते.मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तालासुराच्या साथीने राष्ट्रगीत सादर करून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध व देखणे संचलन,स्वागतगीत,कवायत, नयनरम्य नृत्याविष्कार, देशभक्तिपर गीते तसेच विविध प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.
कार्यक्रमास खेडभाळवणी येथील ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिक गजेंद्र पवार,शिरढोणचे ग्रामपंचायत सदस्य नाना चव्हाण, वाखरी येथील माजी सैनिक घोडके मेजर,शेळवेचे माजी उपसरपंच तुकाराम गाजरे,खेड भाळवणीचे माजी उपसरपंच शहाजी पाटील, शेळवे येथील रामदास गाजरे, प्रभात न्यूजचे सुरज कौलगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच माता-पिता व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी एस.एस.सी. बॅच २०२५-२६ मध्ये प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती, नवोदय व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अंगावर रोमांच उभे करणाऱ्या शिस्तबद्ध संचलनाचे आणि प्रभावी भाषणांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने प्रभावित होऊन सेवानिवृत्त सैनिक गजेंद्र पवार यांनी परेड कमांडर कु. पूर्वा बिभीषण साळुंखे,चि.संस्कार पंडित साळुंखे तसेच इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रोख बक्षिसे दिली.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरणा मिळावी व त्यांच्यात गुणवत्तेची स्पर्धा निर्माण व्हावी या उद्देशाने शेळवे येथील युवक नेते व सामाजिक कार्यकर्ते रामदास गाजरे यांनी कै.बलभीम पांडुरंग गाजरे यांच्या स्मरणार्थ इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास ₹५,००१ व सन्मानचिन्ह,द्वितीय क्रमांकासाठी ₹३,००१ व सन्मानचिन्ह,तर तृतीय क्रमांकासाठी ₹२,००१ व सन्मानचिन्ह अशी भरघोस बक्षिसे जाहीर केली.त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
प्रमुख अतिथी सौ.अलिषा अजित यलमार (कंडरे) यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहा,त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि ती स्वप्ने सत्यात उतरवा,असा प्रेरणादायी यशमंत्र दिला.आपल्या ओघवत्या वक्तृत्वातून त्यांनी विद्यार्थी,पालक व माता-भगिनींना मंत्रमुग्ध केले.प्रशालेची शैक्षणिक गुणवत्ता,शिस्त,विद्यार्थ्यांवर केले जाणारे संस्कार तसेच कमांडो ट्रेनिंग कोर्स यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.भविष्यातही प्रशालेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून भरीव सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय उर्फ बापूसाहेब देशमुख यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांना शुभेच्छा दिल्या.त्यांनी प्रशालेसाठी दोन मोठे एल.ई.डी. फ्लड लाईट्स व आवश्यक फिटिंग साहित्य भेट दिले.यापुढेही प्रशालेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी सांगितले...
प्रशालेचे पालक अनिल जमदाडे यांनी पालक प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त करताना प्रशालेची शैक्षणिक गुणवत्ता,शिस्त आणि विद्यार्थ्यांवर केले जाणारे संस्कार यांचे कौतुक केले.तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक मोहन गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी केले, तर उपस्थित मान्यवर, माता-पिता व पालकवर्गाचे आभार संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी मानले.
विशेष म्हणजे,विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यासाठी प्रशालेतील तब्बल ६० पालकांनी उत्स्फूर्तपणे भरघोस असे योगदान दिले... त्यांच्या या सहकार्याबद्दल प्रशालेच्या वतीने सर्व पालकांचे विशेष आभार मानण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाचा हा दिमाखदार सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.देशभक्ती,शिस्त, संस्कार आणि गुणवत्तेचा सुंदर संगम साधणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.

