नवी मुंबई प्रतिनिधी सुभाष हांडे तेज न्यूज
गेली ३९ वर्षे अखंडपणे वृक्षपूजन, वृक्षारोपण करुन आषाढी एकादशी साजरी करणाऱ्या युथ कौन्सिल नेरुळ या सेवाभावी संस्थेच्या वतीने यंदाही नवी मुंबई महापौर सौ. सुजाताताई पाटील यांच्या हस्ते संस्थेच्या सावली रोपवाटिका प्रकल्प, नेरुळ येथे दिनांक २५ जुलै २०२६ रोजी ही परंपरा पाळण्यात आली. युथ कौन्सिलला यानिमित्त गजानन महाराज भक्त मंडळ, वाशी यांचेही सहकार्य गेल्या काही वर्षांप्रमाणे लाभले.
यावेळी केलेल्या भाषणात महापौर सौ. पाटील यांनी दोन्ही संस्थांच्या निसर्गाप्रति उतराई होण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले व परमेश्वराचे दर्शन वारीने पंढरपूरला जाऊन घेतानाच अशाही प्रकारे चराचरात परमेश्वर शोधून वृक्षांची लागवड व त्यांचे संवर्धन करणाऱ्या निसर्गप्रेमींना त्यात परमेश्वर भेटतो, आशिेर्वाद देतो असे प्रतिपादन केले. या प्रसंगी विचारमंचावर महापालिका शाळेचे मुख्याध्यापक अशोक सोनवणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विकास साठे, नगरसेविका सौ. मीराताई पाटील, लेखक पत्रकार राजेंद्र घरत, गजानन महाराज भक्त मंडळाचे सचिव शिवाजीराव शिंदे उपस्थित होते.
पत्रकार राजेंद्र घरत यांनी वृक्षारोपणाची फोटोबाजी करणाऱ्यांपेक्षा ती लावून, त्यांचे संवर्धन करणाऱ्या तसेच नवी मुंबई महानगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वीच्या काळापासून झाडे लावून नवी मुंबई हिरवीगार करणाऱ्या युथ कौन्सिलच्या कामातील सातत्याची प्रशंसा केली व त्यांनी याबरोबरच सामाजिक सेवेचे जे व्रत अंगिकारले आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत अशा सामाजिक कामात राहण्यात आनंद होत असल्याची भावना यावेळी केलेल्या भाषणातून व्यक्त केली. महापालिकेने आता प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणानंतर पदवी शिक्षणासाठीही व्यवस्था करावी अशी विनंती यावेळी अशोक सोनवणे यांनी महापौरांना केली.
यावेळी महापौरांच्या हस्ते यंदाच्या शालांत परिक्षेत नवी मुंबई महापालिका शाळांतून घवघवीत यश संपादन करणाऱ्या अभीराम मनोज कुमार राऊत, कुमारी रिया राकेश कहार व कुमारी श्रावणी संदीप गालवे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शारीरिक व्याधींवर मात करुन शैक्षणिक, सांस्कृतिक जगतात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ८ व्या इयत्तेत शिकत असणाऱ्या उल्का राजेश झगडे हिचा तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विकास साठे यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गतच आज वाढदिवस असलेले संस्थेचे संस्थापक सदस्य विक्रम राम, जी. आर. पाटील यांचाही वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युथ कौन्सिल नेरुळचे मुख्य सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी दोन्ही संस्थांसह ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनीही परिश्रम घेतले.


