श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या पुढाकाराने देवस्थानच्या विठ्ठल मंदिरात सालाबादा प्रमाणे आषाढी एकादशी उत्साहात.
भजन, दिंड्या, आणि बाल दिंड्यांमुळे अक्कलकोट करांनी अनुभवला वारी आणि भक्तीचा सोहळा.
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
मनुष्य जीवन हे संत सहवासातच पुर्णत्वास जाते. भौतिक सुखाने मनुष्य कितीही समृध्द असला तरी जीवनाची पुर्णता ही समाधानातच आहे. सुखसापेक्ष समाधान हीच जीवनाची पुर्णता आहे असे निरुपण ढोकी लातूर येथील कीर्तनकार ह.भ.प.शाहुराज माने यांनी केले. ते आषाढी एकादशीनिमीत्त विठ्ठल मंदिर ए.वन चौक येथे आयोजित केलेल्या कीर्तन सोहळयात निरुपण करताना बोलत होते.
कीर्तन सेवेच्या मध्य रंगात मंदिर समितीच्या वतीने विश्वस्त महेश गोगी यांनी कीर्तनकार ह.भ.प.शाहुराज माने यांचा सत्कार केला.
या कीर्तन सेवेत पुढे निरुपण करताना कीर्तनकार ह.भ.प.शाहुराज माने यांनी परमार्थ म्हणजे आपल्या जीवनातून नको ते घालवणे होय. कशाचीही वासना मनात ठेवून परमार्थ करु नये. अगदी मोक्षाचीही वासना नको. मोक्षाऐवजी साधनेची काळजी घ्यावी. जीवनाच्या वाटेवरुन चालताना आपल्या हातून घडणारे पाप पुण्य भगवंतास अर्पण करुन मोकळे व्हायचे अशाप्रकारे जीवन पाप पुण्य रहित बनवायचे मगच भगवंताची भेट होते. मनात कोणतीही अपेक्षा व इच्छा न ठेवता केवळ भगवंताच्या भेटीच्या आतुरतेने पंढरीच्या वाटेने निघालेल्या वैष्णवांच्या मेळ्यात प्रत्येक क्षणाला आणि पावलाला परमार्थाची प्रचिती येते. ही प्रचिती अनुभवण्यासाठी त्या संतांच्या सहवासातच वाटचाल करावी लागते.असेही निरुपण यावेळी कीर्तनकार
ह.भ.प.शाहुराज माने यांनी केले. त्यांना हार्मोनियमवर श्रीमंत पांचाळ, चैतन्य पांचाळ, व मृदंगावर कैवल्य पांचाळ तसेच चिकुर्डा, तावशी, व मुस्ती येथून आलेल्या भजनी मंडळांनी साथ संगत केली.
तत्पूर्वी पहाटे ५ वाजता विठ्ठलाची महापूजा मुख्य पुरोहित दीपक व राघवेंद्र बागेवाडीकर यांच्या मंत्रोपचारात व देवस्थान समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी यांच्या हस्ते आरती उपलप व परिवार यांच्या उपस्थितीत झाली. सकाळी ७ ते ९ या वेळेत तावशी, चिकुर्डा व मुस्ती येथून आलेल्या भजनी मंडळांची भजन सेवा संपन्न झाली.
याप्रसंगी उपस्थित सर्व भाविकांना देवस्थानच्या वतीने उपवासाचे फराळ प्रसाद देण्यात आले. श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित उपलप विठ्ठल मंदिरात अशा प्रकारे आज आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दिवसभरात भजन दिंड्या आणि बाल दिंड्यांमुळे याची देही याची डोळा अक्कलकोटकरांनी वारी आणि भक्तीचा सोहळा अनुभवला. आषाढी एकादशी निमित्त दिवसभरात स्थानिक व परगावहून आलेल्या भाविकांनी पांडुरंगाच्या दर्शनासाठी अक्कलकोटच्या विठ्ठल मंदिरात गर्दी केली होती.
याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संतोष पराणे, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, शिवाजी यादव, चंद्रकांत डांगे, प्रा. शिवशरण अचलेर, रवीराव महिंद्रकर, महेश देसाई, काशिनाथ इंडे, श्रीशैल गवंडी, सागर मोरे, संजय मोरे, स्वाती गाडे, सोनाली चव्हाण, वंदना शिर्के, शशिकला मडीखांबे जयश्री माने, व असंख्य भाविक उपस्थित होते.


