पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
“वारीमध्ये सहभागी होणारे लहान मोठे सर्व समान असतात. इथे सर्वजण एकमेकांना माऊली म्हणून प्रेमाने संबोधतात. त्यामुळे देह, मन, वाचा, बुद्धी शुध्द होते. वारीतील सर्वसमावेशकतेत जीवनाचा खरा अर्थ उलगडून सांगितला आहे. म्हणून आयुष्यात एकदा तरी वारीला जायला हवे." असे प्रतिपादन ह.भ.प. भगवतीताई दांडेकर यांनी केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या वतीने आषाढी वारीचे औचित्य साधून विश्वशांती गुरुकुल, वाखरीतळ येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनात ह.भ.प. भगवतीताई दांडेकर बोलत होत्या.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारतचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या आशीर्वादाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी हभप चिन्मय महाराज दांडेकर, श्री. काशीराम दा. कराड, माजी मंत्री उल्हास पवार, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, प्रा. स्वाती कराड-चाटे आणि सौ. उषा विश्वनाथ कराड आदी मान्यवर उपस्थित होते.
भगवतीताई दांडेकर म्हणाल्या, “महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. हा वारकरी संप्रदाय सहिष्णु, नम्र, लीन आहे. त्याच्याकडे सर्वांना सामावून घेण्याची क्षमता आहे. तेथे जातीचा, धर्माचा किंवा स्त्री-पुरुषाचा असा कोणताही भेदभाव नाही. . भगवद्गीता व ज्ञानेश्वरीत जीवनाचे उद्दिष्ट सांगितले आहे. परंतु, ज्ञानेश्वरी समजवून घ्यायची असेल, तर प्रथम माणूस कळला पाहिजे. वारकरी संप्रदाय हे चांगल्या जीवनाचे दर्शन आहे."
"परमात्मा पांडुरंग, ज्ञानेश्वर ही माऊलीची रुपे आहेत. माऊली म्हणजे आई, जी सर्व सोपे करुन सांगते. सर्वांवर जीवापाड प्रेम करते. जिच्या कुशीत विसावले की आराम मिळतो. त्यामुळे अनुभवाच्या ज्ञानातूनच संत मार्गाने ईश्वराकडे जाता येते. परमात्म्याच्या स्मरणाने आपल्याला हे साध्य करता येते,”
उल्हास पवार म्हणाले, " बाबा महाराज सातारकर यांनी सुरू केलेली दिंडीच्या माध्यमातून मन परीवर्तनाची मोठी सेवा घडत आहे. ते ही सेवा संपूर्ण दिंडी मार्गात देतात. आज त्यांच्या कन्या ही सेवा देत आहेत. "
डॉ. मंगेश कराड म्हणाले,“वारीची १५०वर्षांची परंपरा असणारे सातारकर महाराज यांच्या घराण्याच्या प्रवचनाची सेवा लाभणे हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. हीच परंपरा आमच्याही घराण्याची आहे. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या आशीर्वादाने ही परंपरा पुढची पिढी समोर घेऊन जाईल. वाखरीतळ हा पंढरपूरच्या वारीतील महत्त्वाचा आणि शेवटचा टप्पा आहे. जिथे लाखो भाविक आणि ज्ञानोबा-तुकोबा एकत्र येतात यापेक्ष भक्ताला आणखी काय हवे असते.”यानंतर ह.भ.प. बापूसाहेब मोरे यांचे सूश्राव्य असे कीर्तन झाले.


