पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढीवारी साठी पालखी सोहळ्यासोबत पायी चालत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी शासनाचा १०८ अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभाग व राज्य आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे यंदा वारीसाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा उभारली आहे. यावर्षी प्रथमच १० मानाच्या पालखी सोहळ्यांसोबत ६० पेक्षा अधिक रुग्णवाहिका सज्ज असल्याची माहिती सोलापूर जिल्हा व्यवस्थापक डॉ. अनिल काळे यांनी दिली.
रुकमाई सभागृह पोलीस संकुल, पंढरपूर येथे 'समारिटन' मोबाईल ॲप तसेच कार्डिओपल्मोनरी रिसक्सिटेशन (सीपीआर) या बाबतचे प्रशिक्षण पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
'समारिटन' हे ॲप शासनाच्या आरोग्य विभाग आणि बी व्ही जी फौंडेशन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आले आहे. ॲपल स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून ते मोफत डाउनलोड करता येते. या ॲपमुळे केवळ रुग्णवाहिकेशी संपर्कच साधता येणार नाही, तर प्राथमिक उपचाराची माहितीही यामध्ये दिली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचण्यापूर्वी रुग्णाला काही आवश्यक मदत दिली जाऊ शकते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे व 108 चे मुख्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके, डॉ किशोर देव, यांच्या मार्गदर्शनाखली जिल्ह्यात वारकरी -भाविकांना पालखी मार्ग, तळांवर तसेच पंढरपूर शहरात आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याचेही 108 चे सोलापूर जिल्हा व्यस्थापक डॉ. अनिल काळे यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे , डॉ.विजयकुमार सरडे, डॉ. महेश सूडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले,
प्रशिक्षक डॉ.वेदव्यास मोरे, डॉ कौस्तुभ घाटोळे, 108 चे अतिरिक्त व्यवस्थापक युवराज वाघ,सुनील चव्हाण , दिलीप शिंदे तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी समारिटन ॲप
तसेच आरोग्य विभागाने यावर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत 'समारिटन' नावाचे मोबाइल ॲप्लिकेशन सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून वारकऱ्यांना आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी त्वरित संपर्क साधता येणार आहे. ॲपवर आलेल्या माहितीवरून रुग्णवाहिका चालकाला रुग्णाचे ठिकाण अचूक कळणार. यामुळे वारीतील रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळून रुग्णाच्या जीवितास धोका कमी होण्यास मदत होणार आहे.

