पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासित केले असून हा निर्णय ओबीसीवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे सर्व पक्षीय ओबीसी बांधवांनी एकत्रित येवून लाखोच्या संख्येने हरकती नोंदवून या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार रविंद्र धंगेकर यांनी केले.
नामदेव समाजोन्नती परिषदेची ओबीसी आरक्षण बचावासाठी दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ, कसबा पेठ येथे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शिंपी ज्ञातीसंस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी व सभासद यांची सभा संपन्न झाली. या सभेमध्ये आमदार मा. रविंद्रभाऊ धंगेकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशचे संघटक श्री बापूसाहेब पलांडे, नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, भाजपा ओबीसी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक नामदेव माळवदे, मा. नगरसेविका स्मिताताई वस्ते, बारा बलुतेदार समाज विकास संघ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामदास सुर्यवंशी, रोहित यवतकर, माळी महासंघाचे पुणे शहराध्यक्ष दिपक जगताप, विधी सल्लागार अॅड. सतीश कांबळे यांनी ओबीसी आरक्षण व ओबीसीची भविष्यातील दिशा यावर मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले की, ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला समाविष्ट करून ओबीसींना आरक्षणाच्या बाहेरच ढकलण्याचे काम सुरू असून आज आपल्या आपल्यात तेढ निर्माण करण्याचे कारस्थान सध्याचे शासन करीत असल्याची खंत व्यक्त केली. यावेळी सभेने शासनाचा काळ्या फीती लावून निषेधाचा ठराव संमत केला.
आज ओबीसी समाजावर मोठा अन्याय केला जातो आहे. यासाठी पुणे शहरातून लाखोच्या संख्येने हरकती आजपासून नोंदवण्यात आल्या पाहिजेत व यासाठी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात मोठी चळवळ उभी करून राज्यात एक मोठी यात्रा काढण्याची गरज असल्याचे मत नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर यांनी व्यक्त केले.
मराठा समाजाला जरूर आरक्षण द्या परंतू ओबीसीच्या तोंडचा घास जर शासन हिसकावून घेत असेल तर ओबीसी समाज याला रस्त्यावर उतरून जशाच तसे उत्तर देईल असा इशारा बारा बलुतेदार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामदास सुर्यवंशी यांनी दिला.तर ओबीसी समाज बांधवांनी यासाठी रस्त्यावर उतरून शासनाने घेतलेल्या शासन निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी चौकाचौकात निदर्शने करून याची होळी करण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील असा इशारा माळी महासंघाचे पुणे शहराध्यक्ष जगताप दिला आहे.
या सभेस पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदिप लचके, पिंपरी चिंचवड शहर शाखेचे अध्यक्ष एकनाथ सदावर्ते, भाजपा पुणे लोकसभेचे संयोजक ओंकार माळवदकर यांचे सह नामदेव समाजोन्नती परिषदेचे पदाधिकारी तसेच पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ज्ञातीसंस्थेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रत्येकांनी आपली परखडपणे मते मांडली व हरकती घेण्यासाठी मसुद्यावर सह्या करण्यात आल्या. याबाबत पुणे शहरातील सर्व ओबीसी समाजबांधवाची कोअर कमिटी तयार करून आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. आमदार रविंद्र धंगेकर यांना हरकतीबाबतचे निवेदन देऊन ते सरकार कडे द्यावे अशी विनंती नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर यांनी केली. सभेचे सुत्रसंचालन महेश मांढरे यांनी केले.
या सभेत ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी ओबीसी समाजाच्या वतीने पुढे करण्यात आली. अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जनरल सेक्रेटरी तथा ना.स.प. पुणे शहर शाखेचे सचिव सुभाष मुळे यांनी दिली.