गणेश हिरवे मुंबई प्रतिनिधी
मैत्र परिवार ट्रस्टने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दिनांक ८ जुलै २०२३, शनिवार रोजी ठाणे जिल्हा स्त्री जागृती समिती संचालित डहाणू रोड येथील मुक बधीर बाल विकास केंद्र या निवासी शाळेतील ९८ आदिवासी कर्णबधीर विद्यार्थी विद्यार्थिनींना श्रवणयंत्राच्या बॅटऱ्या वितरित केल्या. मैत्र परिवार ट्रस्टच्या श्रवणमित्र प्रकल्पांतर्गत DSV Global Logistics या कंपनीच्या DSV charitable foundation च्या आर्थिक सहकार्याने श्रवणयंत्रांच्या बॅटरींचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या विश्वस्त मधुमती राऊत, स्पीच थेरपीस्ट पूनम पाटील व शिक्षकवृंद उपस्थित होता. मैत्र परिवार ट्रस्टचे अध्यक्ष संतोष दळवी, सचिव प्रकाश कातळकर तसेच विश्वस्त नितीन सामंत, शिल्पा दळवी, देवेंद्र तारी, हर्षा परब व सिरत सातपुते यांच्या हस्ते बॅटरींचे वितरण करण्यात आले.
डहाणूतील या शाळेबरोबरच विरार येथील स्वामी परिज्ञानाश्रम शैक्षणिक व व्यावसायिक केंद्र अपंगांसाठी (दिव्यांग) या शाळेतील ६३ विद्यार्थ्यांनाही वर्षभर लागणाऱ्या बॅटरींचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला सेंटरचे शिक्षक उपस्थित होते. मैत्रपरिवार ट्रस्टच्या विश्वस्त शर्वरी आपटे तसेच सदस्य विद्या स्थळेकर, मिताली रेडकर, अनघा वर्तक, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
'मी असेन तुझ्याबरोबर नेहमीच' हे ब्रीदवाक्य घेऊन जोगेश्वरीतील अरविंद गंडभीर हायस्कूलमधील १९८२च्या १०वीअ मधील विद्यार्थी मैत्र परिवार ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय आहेत. मैत्रांकुर (वंचित विद्यार्थांचे पालकत्व ), आदिवासी पाड्यावरची दिवाळी, विद्यार्थी मित्र, आरोग्य मित्र, श्रवणमित्र, कौशल्य मित्र, वृध्द मित्र (वृध्दाश्रम सहकार्य), मैत्र-शिष्यवृती असे विविध सामाजिक उपक्रम मैत्र परिवार गेली अनेक वर्ष राबवत आहे.
कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत महत्वाचा घटक म्हणजे ते वापरत असलेले श्रवणयंत्र. या विद्यार्थ्यांना हे श्रवणयंत्र वापरण्यासाठी लागणाऱ्या बॅटऱ्या नियमित स्वरुपात उपलब्ध करुन देऊन त्यांचा श्रवण मित्र बनणे हा मैत्र परिवार ट्रस्टचा एक महत्वाचा प्रकल्प आहे. मैत्र परिवाराने श्रवण मित्र बनून कर्णबधीर मुलांच्या जीवनात आवाज आणलाय. हा आवाज या मुलांना ऐकू येत आहे तो त्यांना नियमित पुरवलेल्या बॅटऱ्यांनी. वर्षभर पुरतील एवढ्या बॅटऱ्या मैत्र परिवार या मुलांना नियमितपणे पुरवत आहे. मुंबईतील साधना विद्यालय, प्रगती विद्यालय, रुचिराम थडानी विद्यालय आणि पुण्यातील भावे प्राथमिक, भावे माध्यमिक, व्ही. आर. रुईया विद्यालय, मॉर्डन हायस्कूल या शाळांतील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. श्रवणमित्र योजनेत आतापर्यंत १२ विद्यार्थांना ट्रस्टने श्रवणयंत्रही पुरवले आहे. तसेच नादुरुस्त श्रवणयंत्रे दुरुस्त करुनही दिली आहेत.
श्रवणमित्र ही अद्वितिय योजना मैत्र परिवारातील सदस्यांचे नातेवाईक व मित्र परिवाराने केलेल्या मदतीवर चालू आहे. यंदा ५०० कर्णबधीर मुलांना या प्रकल्पांतर्गत मदत मिळणार आहे. या प्रकल्पासाठी DSV Global Logistics या कंपनीच्या DSV Charitable Foundation ने मैत्रपरिवार ट्रस्टला भरघोस आर्थिक सहाय्य केले आहे.
मैत्र परिवार शैक्षणिक साहित्य सहकार्य करत विद्यार्थी मित्र म्हणून भूमिका निभावत आहे. यंदाच्या विद्यार्थी मित्र उपक्रमांतर्गत आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना स्कूलकीट वाटपाचा कार्यक्रमही ८ जुलै २०२३ रोजीच पार पडला. डहाणू तालुक्यातील वाणगाव येथील साखरे- माच्छीपाडा व गोवणे- तांबडपाडा या दोन जिल्हापरिषद शाळांतील ७३ आदिवासी विद्यार्थ्यांना स्कूलकीटचे वाटप करण्यात आले.
पेन्स सहयोग फाऊंडेशनच्या समन्वयाने आणि सहकार्यांने राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मैत्रपरिवार टीमबरोबरच पेन्स सहयोग फाउंडेशनच्या कार्यकर्त्या पूनम राऊत आणि मेघना वैराळ यांनी विशेष मेहनत घेतली.

