पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
मावळच्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानावर आपल्या अफाट वेगाने आणि दमदार कामगिरीने दबदबा निर्माण करणाऱ्या ‘भारतकेसरी ओम्या’ या प्रसिद्ध बैलाचे निधन झाले. वारंगवाडी येथील गाडामालक रामनाथ वारिंगे यांच्या कुटुंबाचा लाडका ओम्या गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील विविध बैलगाडा घाटांवर आपल्या वेगाने राज्य करत होता.
ओम्याच्या निधनाची बातमी समजताच मावळसह राज्यातील बैलगाडा शौकिनांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. शेकडो बैलगाडाप्रेमींच्या उपस्थितीत ओम्याला अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यात आला.
यावेळी गाडामालक रामनाथ वारिंगे यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.गेल्या सुमारे नऊ वर्षांपासून ओम्याने महाराष्ट्रातील विविध प्रसिद्ध बैलगाडा घाटांवर आपल्या वेगाचा ठसा उमटवला. अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवत त्याने बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे ओम्या हा केवळ एक बैल नव्हता, तर मावळच्या बैलगाडा शर्यतीची शान आणि वारिंगे कुटुंबाचा अभिमान होता.
*ओम्याच्या नावावर मोठमोठी बक्षिसे*
आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ओम्याने अनेक मानाची बक्षिसे जिंकली होती. त्यामध्ये २ जेसीबी, ८ थार, १२ ट्रॅक्टर, ३ बोलेरो, १७५ दुचाकी, २५ चांदीच्या गदा १५०० हून अधिक सन्मानचिन्हे याशिवाय बुलेट, सोन्याची बक्षिसे आणि रोख रक्कम अशी अनेक आकर्षक बक्षिसेही ओम्याने आपल्या नावावर केली होती.
आपल्या वेगवान आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ओम्याला ‘मावळ किंग’, ‘भारतकेसरी’, ‘महाराष्ट्र केसरी’, ‘मावळची राजधानी एक्सप्रेस’, ‘तुफान गतीचा बेताज बादशहा’ आणि ‘बैलगाडा क्षेत्राचा कोहिनूर’ अशा मानाच्या बिरुदांनी गौरवण्यात आले होते. सन २०२४ मध्ये मावळ फेस्टिव्हलमध्ये ‘बैलगाडा शर्यतीचा राजा मावळ किंग ओम्या’ म्हणून त्याचा विशेष सत्कार करण्यात आला होता. हा सन्मान त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा क्षण ठरला होता.
अनेक मान्यवरांनी ओम्याला श्रद्धांजली अर्पण करत तो मावळच्या मातीतला अभिमान असल्याच्या भावना व्यक्त केल्या. बैलगाडा शर्यतीच्या मैदानावरील त्याचा वेग, जिद्द आणि दमदार ठसा कायम स्मरणात राहील. आज ओम्या आपल्यात नसला, तरी त्याने बैलगाडा शर्यतीच्या मैदानात निर्माण केलेला इतिहास आणि त्याच्या वेगाच्या आठवणी बैलगाडाप्रेमींच्या मनात कायम जिवंत राहतील.
लाडक्या ‘भारतकेसरी ओम्या’च्या निधनाने मावळच्या बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, चाहत्यांनी सोशल मीडियासह प्रत्यक्ष उपस्थित राहून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

