नवी मुंबई प्रतिनिधी सुभाष हांडे देशमुख
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या मूलभूत गरजेच्या शारीरिक, वैद्यकीय आणि व्यवस्थापनाकडून मिळणाऱ्या इतर विविध सोयी सुविधा कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास विश्वासार्ह ठरलेले एक माध्यम म्हणून अधोरेखित झालेले आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम ही संस्था, या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आरसीएफ च्या जेट होस्टेलच्या सभागृहात दिनांक ७ जुलै रोजी उत्साही वातावरणात पार पडली. व्ही. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत विषयवार सखोल चर्चा झाली. आणि कामाची पुढील दिशा ठरविण्यात आली.
सभेचे सर्व विषय रीतसर चर्चिले गेल्यावर आणि सर्व ठराव मंजूर झाल्यावर अध्यक्ष व्ही. डी. पाटील यांनी फोरमच्या कार्याचा आढावा घेतला. उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, गेली अठरा वर्षे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या या फोरमनी आरसीएफ व्यवस्थापनाशी सलोख्याचे असे परस्परांतील संबंध अधिक दृढ ठेवून, निवृत्त कर्मचाऱ्यांना अधिक सुलभपणे जीवन कसे जगता येईल याची सातत्याने जाणीव ठेवली आहे आणि त्या दृष्टीने व्यवस्थापनाशी संपर्क ठेवला आहे.
भारत सरकारच्या आरसीएफ कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यावर प्रत्येक कर्मचाऱ्याने आपापल्या क्षमतेप्रमाणे महाराष्ट्रासह इतर प्रांतात आपआपले कायमस्वरूपी वास्तव्य केले आहे. या सर्वांसाठी दरवर्षीच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात एक स्नेह मेळावा फोरम तर्फे आयोजित करण्यात येतो. त्यामुळे शक्य असलेले बहुसंख्य सेवानिवृत्त कर्मचारी या एक दिवसाच्या स्नेह मेळाव्यात आनंदाने सहभागी होऊन एकमेकांना भेटतात आणि आपापसातील विचार, कौटुंबिक प्रश्न, खुशाली आदान प्रदान करतात आणि दिवसभराच्या मेळाव्यातून एक ऊर्जा घेऊन पुन्हा आपल्या गावी परततात. त्यामुळे फोरम निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीचे विचार आदान प्रदान करण्याचे एक व्यासपीठ ठरले आहे. फोरमचे दोन व्हाट्सअप ग्रुप असल्याने त्यांच्या माध्यमातूनही जे कर्मचारी प्रत्यक्ष भेटू शकले नाहीत; ते आपला विचार मांडतात व एकमेकांच्या संपर्कात राहतात. पुढील वर्षीचा स्नेह मेळावा दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केला आहे असेही श्री. पाटील यांनी सुचित केले.
आरसीएफ सोशल फोरमने सामाजिक भानही जपले आहे. आरसीएफ चे भूतपूर्व अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उदय शंकर झा यांच्या सक्रिय पुढाकाराने कार्यरत असलेल्या रोटरी क्लब चेंबूर या सेवाभावी संस्थेबरोबर गेली बारा वर्षापासून फोरमने सहयोग दिला आहे. देत आहे. पालघर जिल्ह्यातील विविध आदिवासी गावात आदिवासी दत्तक ग्राम योजनेत सहभागी होऊन अनेक आदिवासी गावे दत्तक घेऊन त्यात त्या गावासह तेथील कुटुंबीयांच्या सर्वांगीण विकासासाठी होत असलेल्या विकास कामात फोरम प्रयत्नशील आहे. यामध्ये प्रामुख्याने कृषी शिक्षण, आरोग्य तपासणी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सोलरची उपलब्धता, शाळा - रस्ते दुरुस्ती, फळबाग लागवडीस प्रोत्साहन अशा प्रकारच्या सर्वांगीण विकासाच्या उपक्रमांचा समावेश आहे.
संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री. डी. टी. बारकुंड, बाळासाहेब शिंत्रे, सुबोध मोरजकर, प्रभाकरराव साळुंखे, एस. व्ही चंद्रगिरी, शक्तीचंद, सी. एल. शर्मा, आर. एस. नाईक, किसन सिंह, सुभाष हांडे देशमुख आदींनी सभा यशस्वी केली.शेवटी डी. टी. बारकुंड यांनी उपस्थितांचे यथोचित आभार मानले.

