भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
ग्रामीण भागातील मुली व महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आवश्यक ते पोलीस सहकार्य व संरक्षण मिळावे, यासाठी ‘पोलीस प्रशासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स आणि निर्भया पथक यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डगळे मार्गदर्शन करत होते.
यावेळी प्रशांत डगळे म्हणाले की, मुली व महिलांनी सोशल मीडियाचा वापर चांगल्या व विधायक कामांसाठी करावा. सोशल मीडियाचा गैरवापर टाळावा. कोणाकडूनही त्रास होत असल्यास निर्भया पथकाच्या क्यूआर कोड किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तक्रार करावी. तक्रारीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाला योग्य ती कारवाई करता येईल. महिलांना व मुलींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन त्यांच्या दारी येत असून या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष राजश्री ताड यांनी गावातील विविध समस्या मांडल्या. तसेच या समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला स्कूल कमिटीचे चेअरमन संभाजी शिंदे, उपसरपंच नितीन शिंदे, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष प्राची माळवदे, प्राचार्य के. डी. शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक तथा निर्भया पथक प्रमुख सुप्रिया यादव, विधीतज्ञ विनोद गायकवाड, संशोधक व अभ्यासक तन्मय डगळे, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत शिंदे, लक्ष्मण कुचेकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल निर्मला वाघमारे, शाहीन काझी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एच. शिंदे यांनी केले, तर आभार संभाजी शिंदे यांनी मानले. यावेळी परिसरातील महिला, मुली, विद्यार्थीनी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन थेट गावपातळीवर पोहोचत असल्याने ‘पोलीस प्रशासन आपल्या दारी’ हा उपक्रम ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

