पंढरपूर प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कडून घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रथम सत्राच्या परीक्षेत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले असून विद्यापीठाच्या पहिल्या १० रँकमध्ये स्वेरीच्या ११ विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे.
विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिल्या रँकमध्ये आलेली प्रथम वर्ष अभियांत्रिकी मधील ऋतू सुहास जाधव या विद्यार्थिनीस ९१.८६ % गुण मिळाले आहेत.शिवाय एकूण ४५ विद्यार्थ्यांना एस.जी.पी.ए नुसार १० पैकी १० ग्रेड पॉइंट मिळालेले आहेत. २७ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण तर १८३ विद्यार्थ्यांना ८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत.
सर्वात विशेष म्हणजे तब्बल ३४७ विद्यार्थी विशेष श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत. रात्र अभ्यासिका, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे वैयक्तिक लक्ष, उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज वाचनालय, अभ्यासासाठी मुबलक संदर्भ पुस्तके आणि योग्य मार्गदर्शनासह विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास या बाबींमुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षेच्या निकालात गरुड झेप मारली आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.सतीश लेंडवे यांच्यासह सर्व वर्गशिक्षक व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, सर्व विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.