सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहराचं पर्यावरण सुधारायचं असेल तर लोकसहभागातून झाडांचे जबाबदार पालकत्व स्वीकारत देशी वृक्षांचे रोपण,संगोपन, संवर्धन करण्याशिवाय पर्याय नाही त्यासाठी संस्कारक्षम पिढी घडवण्यावर पालकांनी भर द्यावा असे आवाहन वृक्ष संवर्धक श्रीराम रामदासी यांनी केले .
परसबाग सोलापूरची या पर्यावरणीय व्यासपीठाच्या पुढाकाराने शाळा - महाविद्यालयीन मुले - मुलीं आणि पालकांसाठी दक्षिण कसब्यातील दाते गणपती परिसरात देशी वृक्ष परिचय फेरीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी श्री.रामदासी यांनी आपले अभ्यासपूर्ण पर्यावरणीय निरीक्षण नोंदवले.परसबाग सोलापूरची या पर्यावरणीय व्यासपीठाचे संस्थापक श्री.नारायण पाटील व सौ.शुभदा पाटील,सौ.भारती रामदासी,अडेनियम संवर्धक श्री.नितींन अणवेकर व श्री.ओम धुत्तरगावकर,श्री.योगेश जक्कल,ड्रीम फौंडेशनचे श्री.काशीनाथ भतगुणकी यांची प्रमुख उपस्थिती होती.नळदुर्ग हुन पर्यावरणप्रेमी श्री.किरण जाधव यांनी आपली कन्या कु.माधुरी सह प्रेरणादायी सहभाग नोंदवला.आयर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थी डॉक्टर चमुमधील श्री.जिनेश ओसवाल आणि कु.समिधा कस्तुरे ,त्यांच्या सहका-यांनी या देशी वृक्षांच्या औषधी उपयोगा बद्दल माहिती दिली.
प्रारंभी श्री.नारायण पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करुन आपल्या प्रास्ताविकातून या देशी वृक्ष परिचय फेरीची संकल्पना आणि संस्कारातून पर्यावरणाचे संवर्धन या परसबाग सोलापूरची या व्यासपीठाच्या संकल्पनेची माहिती दिली.
याप्रसंगी बोलताना श्री.रामदासी यांनी आपल्यावर वृक्षप्रेमाचे संस्कार आईनेच केले असल्याचे आवर्जून सांगितले.वयाच्या पंधराव्या वर्षी आईच्याच परवानगीनें आपण स्वतः दाते गणपतीच्या प्रवेशद्वारालगत पारिजातकाचे रोप लावले होते.ते झाडं आजही संवर्धित आहे.एस टी मध्ये कंडक्टर म्हणून काम करत असतानाही वृक्षसंवर्धनाचा हा वसा जपणं चालुच होते.या काळात सुमारे ४५ देशी वृक्ष आणि दोन वेलींचे रोपण,संगोपन,संवर्धन केले असल्याचे त्यांनी वृक्षसंपदा दाखवुन देत या कामाची आपली प्रेरणादायी कार्यपध्दती त्यांनी विषद केली.
दक्षिण कसब्यातील दाट लोकवस्ती व रहदारीच्या ठिकाणी केवळ लोकसहभागातून देशी वृक्षांचे रोपण करुन ते संवर्धित करण्याचा आपला प्रयोग लक्षणीय स्वरुपात सिध्द झाल्याचे हे मुर्तरुप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमात परसबाग सोलापूरची या व्यासपीठाच्या सदस्यांसह १६ विद्यार्थी आणि ४२ स्री - पुरुष पालकांनी वेळेवर सहभाग नोंदवला आहे
*या वृक्षांची झाली भेट...!*
पळस,शमी,पांढरी- काळी निरगुडी, बदाम,बेल,शिरस टिकोमा,बहावा,वड,पिंपळ, औदुंबर,अशोक,सिता अशोक,पतंगी, पारिजातक,शिरवळ,आपटा,जांभुळ,पांढरा ताम्हण,वरुण वातावई,कदंब,सोनचाफा,गोल्डन बांबु,कडुनिंब,सावर,शिरीष,बकुळ,महानिंब आणि गुळवेल,मधुमालती या वेली,पाच रंगांच्या कोरंटी. श्री.सोमनाथ कमठणकरांच्या बागेतील देशी वृक्ष - वनश्री.