पंढरपूर प्रतिनिधी मनिषा कुलकर्णी तेज न्यूज
दिवाळीच्या सणात साहित्याचा आणि स्नेहाचा गोड सुगंध पसरवत, 'मोही कॅफे' येथे नुकताच 'काव्य दीपावली' हा पहिलावहिला साहित्यिक सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. जुना कराड नाका परिसरातील गडम हॉस्पिटल शेजारील मोही कॅफेमध्ये पार पडलेल्या या अनोख्या मैफलीत कवींनी आपल्या बहारदार रचना सादर करत उपस्थितांची मने जिंकली. संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणात कॉफीचा सुवास आणि कवितांच्या गंधाने संपूर्ण परिसर काव्यमय झाला होता.
विविध विषयांच्या स्पर्शाने रंगली मैफल
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय संस्मरणीय ठरली. यात यश नागणे, गजानन पवार, वैष्णवी कुलकर्णी, राजुभाई मुलाणी, प्रिती माळवदे, पांडुरंग सलगर, रोहिणी सोले, सुनील कोरे, रवी सोनार, गजानन गायकवाड, सचिन कुलकर्णी, मधुकर सुतार, शुभांगी दहिवाळ, आदिती उत्पात , प्रताप शिंदे, गणेश पवार, सुरभी कुलकर्णी, अनुजा नांदवते, सिद्धी चाकोते, आणि डॉ. बाळराजे साळुंखे या नामांकित व उदयोमुख कवी-लेखकांनी सहभाग घेतला.
यावेळी दिवाळीचा आनंद, आईचे प्रेम, बळिराजा (शेतकरी), निसर्गाचा पाऊस, दुष्काळ आणि आळंदी-पंढरपूरची श्रद्धा असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी अशा विविध भावस्पर्शी विषयांना कवींनी आपल्या कवितांमधून प्रभावीपणे स्पर्श केला.
चिमुकली सुरभी कुलकर्णी आणि राजू मुलाणी ठरले केंद्रबिंदू
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली ती चिमुकली कवयित्री सुरभी कुलकर्णी! तिने 'आई' या विषयावर सादर केलेल्या अत्यंत भावूक कवितेने उपस्थितांची मनमुराद दाद मिळवली. तिच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक थक्क झाले. याशिवाय, राजू मुलाणी यांनी आपल्या सुरेल आवाजात सादर केलेल्या कराओके गीताने संपूर्ण वातावरणात एकच उत्साह आणि चैतन्य भरले. कवितांच्या जोडीला काही हसतखेळत गप्पागोष्टी आणि भन्नाट किस्से यांनी मैफलीत रंगत आणली.
ग्रंथ आणि गुलाबाच्या फुलांनी साहित्यिकांचा सन्मान
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सर्व सहभागी साहित्यिकांचा गुलाबाचे फूल आणि मार्मिक संवादाचा विशेष 'दिवाळी अंक' भेट देऊन गौरव करण्यात आला. साहित्याच्या धाग्यांनी रसिकांना आणि कवींना एकत्र बांधणारा हा सोहळा उपस्थितांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला.
हा अनोखा साहित्यिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बाळराजे साळुंखे यांचे विशेष आयोजन लाभले होते. या पहिल्यावहिल्या 'काव्य दीपावली' सोहळ्याने पंढरपूरच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वर्तुळात एक नवी ऊर्जा निर्माण केली आहे.


