फळबागांसाठी हेक्टरी १.२५ लाखांचे पॅकेज, दिवाळीपूर्वी अनुदान देण्याची मागणी
मंगळवेढा प्रतिनिधी तेज न्यूज
माझ्या मतदार संघातील तीव्र दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, फळबागांसाठी हेक्टरी किमान १ लाख २५ हजार रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करावे आणि दुष्काळ अनुदान दिवाळीपूर्वी वितरित करावे, अशा १७ मागण्यांचे निवेदन मंगळवेढा येथे पाहणी दौऱ्यासाठी आलेल्या केंद्र सरकारच्या आंतरमंत्रालयीन पथकाकडे आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.
माझ्या मतदार संघातील पावसाअभावी शेती संकटात सापडली असून, अनेक शेतकऱ्यांना पेरणी करता आलेली नाही. उभी पिके, ऊस आणि डाळिंबासह विविध फळबागांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतजमिनीचा सरसकट पंचनामा करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
पेरणी न झालेल्या क्षेत्रालाही नुकसानभरपाई द्यावी, ई-पीक पाहणीची सक्ती शिथिल करावी आणि सातबारा उतारा, स्वयंघोषणापत्र व प्रत्यक्ष क्षेत्र पडताळणीच्या आधारे मदत निश्चित करावी, पिके वाचविण्यासाठी खासगी टँकरवर केलेला खर्च तसेच उत्पन्नातील घट विचारात घेऊन भरपाई देण्यात यावी.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवून पीककर्जाची पुनर्रचना करावी, कर्जमाफीची अंमलबजावणी करावी आणि जनावरांसाठी चारा डेपो किंवा छावणी तात्काळ चालू करावी तसेच कृषी व घरगुती वीजजोडण्या खंडित करू नयेत.आणि शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यात द्यावी,
भोसे व ४० गावे, कासेगाव,आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची थकीत वीजबिले व पाणीपट्टी माफ करून दुष्काळ संपेपर्यंत मोफत वीज व पाणी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
तालुका स्तरावर स्वतंत्र दुष्काळ निवारण केंद्र स्थापन करावे, रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करून स्थलांतर रोखावे आणि दुर्गम वाड्या-वस्त्यांपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी निवेदनात आहे.
याशिवाय कृष्णा-माण -भीमा नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य द्यावे, अतिरिक्त पाणी मंगळवेढ्याकडे वळविण्याचा विचार करावा आणि भीमा व माण नदीवरील जुन्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या जागी आधुनिक स्वयंचलित बॅरेज उभारण्यासाठी निधी द्यावा, असेही नमूद करण्यात आले आहे.
पाऊस न झाल्यामुळे यावर्षी मंगळवेढा शिवारात जवळपास 15 हजार हेक्टरवर पेरणी होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी लागणार असून आंधळगाव लेंडवे चिंचाळे , गोणेवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पावसाअभावी जळू लागलेल्या पिकांची पाहणी केंद्रातून आलेले केंद्रीय पथकातील आलेल्या अधिकारी व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारीयांच्या समवेत पाहणी केली..
दिवाळीपूर्वी दुष्काळ अनुदानाचे वाटप करून शेतकरी कुटुंबांना दिलासा द्यावा. केंद्राच्या पथकाने १७ मागण्यांचा आपल्या अहवालात समावेश करून दुष्काळग्रस्तांना सर्वसमावेशक मदत मिळण्यासाठी शासनाकडे ठोस शिफारशी कराव्यात अशी विनंती आमदार समाधान आवताडे यांनी केंद्रीय पथकाकडे केली आहे. यावेळी श्री अफसर खान,सुमित शर्मा,जिल्हा कृषी अधिकारी भोसले , उप जिल्हाधिकारी अभिजीत पाटील,प्रांताधिकारी माळी . तहसीलदार जाधव साहेब तालुका कृषी अधिकारी मिसाळ , पोलीस निरीक्षक बोरिगिड्डे, गटविकास अधिकारी शेख , सभापती दिपाली ताड उपसभापती अर्जुन मल्हाळे, उपनगराध्यक्ष भगत , जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, रमेश भांजे, करुणाताई शिवशरण, पंचायत समिती सदस्य विनायक यादव आदी मान्यवर उपस्थित होते

