भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जात्मक, प्रभावी आणि लोकभिमुख आरोग्य सेवा मिळाव्यात या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, भाळवणी ता. पंढरपूर येथे दोन टप्प्यांत (दिनांक ३०/०९/२०२६ ते ०१/१०/२०२६ आणि ०७/१०/२०२६ ते ०८/१०/२०२६) सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, पुणे आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सुहास कोरे, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ज्ञांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना १४ मुख्य विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने गरोदरपणातील, प्रसूतीदरम्यानची व प्रसूतीनंतरची काळजी
नवजात शिशु व अर्भक आरोग्य सेवा, बालक आणि किशोरवयीन आरोग्य
कुटुंब नियोजन व गर्भनिरोधक सेवा
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन व छाननी
डोळे व कान समस्यांची प्राथमिक काळजी आणि मौखिक आरोग्याची काळजी
वृद्धपकाळातील आरोग्यसेवा व वेदनाशामक काळजी
आपत्कालीन वैद्यकीय सेवा व मानसिक आरोग्य समुपदेशन
योग, आयुष उपचार पद्धतीचा वापर, नेतृत्व गुण आणि महिला आरोग्यात पुरुषांचा सहभाग विषयांवर सविस्तर मार्गदर्शन झाले
प्रशिक्षणादरम्यान उपचारात्मक व प्रतिबंधात्मक सेवांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि आरोग्य केंद्रांचा गुणात्मक दर्जा कसा वाढवावा, याविषयी सखोल माहिती देण्यात आली. या अद्ययावत ज्ञानामुळे आणि कौशल्यांमुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना अधिक चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
या प्रसंगी भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निशा रोकडे, डॉ. ज्योती लिंगे, CPHC प्रशिक्षक डॉ. अमेय फुले, डॉ. सुमित्रा कुरळे, नेत्र चिकित्सक श्री. अनिल यादव, आरोग्य सहायिका श्रीम. विजया चव्हाण, आरोग्य सहायिका श्रीम. क्रांतिस्नेहल पाटील (शेवाळे), आरोग्य सेविका श्रीम. सुधामती गंगणे यांच्यासह आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, गट प्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


