अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर आणि सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे करण्यात आले. या स्पर्धेला जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे १५० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले सर, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे सर , पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे, क्रीडा प्रशिक्षक संजय राऊत, भीमाशंकर पाटील, भीमराव दुधाळ उपस्थित होते.
वेटलिफ्टिंगसारख्या शारीरिक सामर्थ्य, चिकाटी, सातत्य आणि शिस्तीची कसोटी पाहणाऱ्या खेळामध्ये विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग ही निश्चितच समाधानाची बाब असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. जिल्हास्तरीय स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची तसेच पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी संधी मिळत असल्याचेही नमूद करण्यात आले.
या स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंमध्ये मोठा उत्साह दिसून आला. विविध वयोगटांतील खेळाडूंनी आपले वजनगटानुसार कौशल्य सादर केले. प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक आणि पालकांनीही खेळाडूंना प्रोत्साहन देत स्पर्धेचे वातावरण उत्साहपूर्ण केले.
उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी पत्रकार नौशाद मुलाणी, आमीर मोहोळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना प्रसिद्धी देत खेळाडूंच्या कामगिरीला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
सदाशिवराव माने विद्यालयाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक करण्यात आले. जिल्हा क्रीडा कार्यालय आणि विद्यालयाच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे अकलूजमध्ये क्रीडा वातावरणाला चालना मिळाली असून, सहभागी खेळाडूंना जिल्हास्तरीय व्यासपीठावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली.

