पुस्तक भेटीचा श्रीगणेशा
गणेशोत्सव म्हटला की भक्ती व उत्साहाचा अनोखा संगम. त्याचप्रमाणे ज्या कारणासाठी हया उत्सवाची सुरुवात झाली ते म्हणजे एकात्मता व सदभावनेची मुहूर्तमेढ. आज शहरांबरोबरच ग्रामीण भागांतदेखील गणेशोत्सवाची एक वेगळी ओळख व परंपरा टिकून आहे. आप्तेष्टांच्या भेटीगाठी, हितगुज आणि सामाजिक - कौटुंबिक मेळ श्री गणेशाच्या दर्शनाने साध्य होत असल्याने अनेकांच्या लेखी या उत्सवाचे वेगळे महत्व टिकुन आहे. उत्सवाच्या निमित्ताने अनेक भेटीगाठी होतातच, पण अनेकजण विविध उपयोगी उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करतात. त्यात आकर्षक सामाजिक देखावे, इको फ्रेंडली गणेशमुर्ती, वहीपेन वा शैक्षणिक साहित्य अर्पण व विविध समाजोपयोगी उपक्रम साजरे केले जातात. मीदेखील गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक नातलगांच्या, मित्रमंडळींच्या घरी दर्शनाला दरवर्षी हजेरी लावत असतो. गेल्या आठ दहा वर्षांपासुन हया दर्शनभेटीच्या निमित्ताने यजमानांना माझे स्वलिखीत पुस्तक भेट देण्याचा वाचनबध्द उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे दरवर्षी गणेशात्सवाच्या निमित्ताने एक नवे पुस्तक प्रकाशित करण्याचा माझा संकल्प असतो जो श्री कृपेने आजवर पूर्ण झालेला आहे. दरवर्षी श्री गणेश दर्शनाला जाताना मी माझे स्वलिखित पुस्तक मित्र आप्तेष्टांना भेट म्हणून देतो.
गणपती बाप्पा हा बुद्धीची देवता. बाप्पांच्या उत्सवात ज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी, या विचारातून ही संकल्पना सुचली. सुरुवातीला हा उपक्रम छोटा वाटत असला तरी आता अनेक आप्तेष्ट या “पुस्तक प्रसादा”ची वाट पाहतात. पुस्तक ही केवळ भेट नाही, तर ती विचारांची शिदोरी आहे. ती एका घरातून दुसऱ्या घरात ज्ञानाचा दिवा घेऊन जाते. मोदकाचा गोडवा क्षणिक असतो, पण पुस्तकातला विचार आयुष्यभर पुरतो. एक पुस्तक एका परिवारातील १०० व्यक्तीपर्यंत पोहोचते आणि लेखकाला १०० वर्षे जिवंत ठेवते अशी माझी धारणा आहे.
यंदाच्या गणेशोत्सवातही हा ज्ञानयज्ञ अखंड सुरू आहे. बाप्पाच्या आगमनासोबत घराघरात माझे स्वलिखीत पुस्तक पोहोचवणे, हाच माझ्यासाठी खरा उत्सव आहे आणि हीच माझी बाप्पाप्रतीची आरती.
वैभव मोहन पाटील
ठाणे

