वाडी कुरोली-धोंडेवाडी प्रतिनिधी स्वप्नील जमदाडे तेज न्यूज
वाडी कुरोली-धोंडेवाडी येथील वसंतराव काळे प्रशालेत गणेशोत्सव २०२६ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘वसंत व्याख्यानमाले’च्या दुसऱ्या पुष्पात ‘नैतिक मूल्य आणि शिक्षण’ या विषयावर सांगोला विद्यामंदिर शाळेचे माजी प्राचार्य महादेव घोंगडे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेतील विद्यार्थिनी तसेच जानकी पुरस्कार विजेती कु. स्नेहा लामकाने हिचा महादेव घोंगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी घोंगडे यांनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनातून ‘जीवन आणि जेवण’ यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विविध कथा, प्रसंग व उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले. तसेच रामायणातील विविध कथांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांनी जीवनात नैतिक मूल्ये, संस्कार आणि चांगले विचार अंगीकारण्याचे आवाहन केले. प्रशालेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘आनंदी शनिवार’ या उपक्रमाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या विचारपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक एस. आर. कुलकर्णी तसेच पर्यवेक्षक के. ए. गाजरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. बी. लिंगे यांनी केले.
या व्याख्यानाचा लाभ प्रशालेतील शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्साहाने घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच जीवनमूल्ये व संस्कार यांचे महत्त्व समजले.

