पिराची कुरोली प्रतिनिधी समाधान काळे तेज न्यूज
मॉडर्न हायस्कूल, पिराची कुरोली येथे गणेशोत्सव २०२६ निमित्त आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पात ‘महाराष्ट्र माझा’चे संपादक अविनाश सुर्वे यांनी ‘सुसंस्काराची विद्यापीठे जपूया’ या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
शालेय वय हे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे महत्त्वपूर्ण वय असून, विद्यार्थ्यांनी शिस्तीत मस्ती करत शिक्षणाचा आनंद घेतानाच आपल्या भविष्यातील ध्येयाची निश्चिती करावी, असे आवाहन श्री. सुर्वे यांनी केले. साध्या-साध्या चांगल्या सवयी, स्पष्ट ध्येय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या माध्यमातून जीवनातील यशाचे शिखर गाठता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
शालेय शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान, संस्कार, विचारांची समृद्धी आणि जीवनमूल्यांची जाणीव व्हावी, या उद्देशाने मॉडर्न हायस्कूलमध्ये वसंत व्याख्यानमालेसारखे उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांचे विचार ऐकण्याची आणि त्यातून प्रेरणा घेण्याची संधी मिळत आहे.
यावेळी व्यासपीठावर प्रभात न्यूजचे संपादक सूरज कौलगे, श्रीराम कौलगे, प्रशालेचे मुख्याध्यापक समाधान काळे व मुलाणी सर उपस्थित होते.
आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सहशिक्षक अतुल जाधव यांचा प्रशालेच्या वतीने यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एस. बी. कौलगे सर यांनी केले. सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी मयुरी लामकाने हिने केले, तर आभार मुजावर सर यांनी मानले.
ज्ञान, संस्कार आणि विचारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविण्याची वाटचाल मॉडर्न हायस्कूलने वसंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून अधिक समृद्ध केली आहे.
ज्ञान • संस्कार • विचार • व्यक्तिमत्त्व विकास
आपली शाळा… आपला अभिमान!

