पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
समाजातील प्रत्येक उपेक्षित घटकाला आता मान-सन्मान मिळू लागला असला, तरी तृतीयपंथी व्यक्तींना आजही दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. केंद्र व राज्य शासनाने अनेक कायदे आणि शासन निर्णय करूनही त्यांची प्रत्यक्षात काटेकोर अंमलबजावणी होत नाही, अशी खंत महाराष्ट्र राज्य ट्रान्सजेंडर हक्क संरक्षण व कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्षा डॉ. सान्वी जेठवानी यांनी व्यक्त केली.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात मराठी विभाग, महाराष्ट्र शासन (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग) आणि नांदेडच्या 'सप्तरंगी सेवाभावी संस्थे'च्या संयुक्त विद्यमाने 'तृतीयपंथीयांचे कल्याण आणि हक्क संरक्षण: माहिती, प्रसारण व जनजागृती' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. जेठवानी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव होते. व्यासपीठावर विशेष समाजकल्याण कक्ष अधिकारी महादेव शिंदे, उमेश पुजारी, डॉ. सुशील शिंदे व डॉ. आनंद शिंदे उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ. जेठवानी पुढे म्हणाल्या, "तृतीयपंथीयांना ओळखून त्यांच्या वैद्यकीय, मानसिक आणि भौतिक गरजा पूर्ण करणारी व्यवस्था सर्व पातळ्यांवर निर्माण व्हायला हवी. रस्त्यावर टाळी वाजवणे आणि भीक मागणे हे सर्व कोणत्याही तृतीयपंथीयाला नको आहे. त्यांना रोजगार, शासकीय अर्थ सहाय्य आणि हक्काचे घर मिळाले तर ते स्वतःच्या पायावर उभे राहून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकतील."
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी रयत शिक्षण संस्था उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी नेहमीच तत्पर असल्याचे सांगत, तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचे महाविद्यालय सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील अनेक तृतीयपंथीयांसह महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी केले तर आभार डॉ. सुशील शिंदे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मराठी विभागातील प्रा.डॉ. दत्तात्रय डांगे, डॉ. बापूसाहेब घोडके, प्रा. हरीभजन कांबळे, प्रा. अंकुश घुले, अभिजीत जाधव, अलकेश यांच्यासह कार्यालयीन सेवकांनी अथक परिश्रम घेतले.

