कुर्डुवाडी प्रतिनिधी संतोष हलकुडे तेज न्यूज
राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया सध्या जोर धरत असल्याचे चित्र दिसत असून यामध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरच्या दृष्टीने झपाट्याने गती आणणारे गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी अर्थात श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य व खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे हे शिक्षकांच्या प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करत असल्याचे पाहायला मिळत आहे. डॉ.रोंगे सर यांनी गेल्या वर्षापासून पुणे विभागातील शाळा महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी देण्यावर भर दिला असून ग्राउंड पातळीवर डॉ. रोंगे सरांना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.
या अनुषंगाने प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटीच्या रूपाने प्रचारात मात्र कमालीची आघाडी घेतली आहे. डॉ. रोंगे सरांची मुद्धेसूद आणि व्यवस्थित मांडणी, प्रत्येक समस्येचा सुक्ष्म अभ्यास या धोरणांमुळे स्वेरीला अफाट यश मिळाले असून स्वेरी बरोबरच कासेगाव (ता. पंढरपूर) मधील स्वाईप तथा श्री.विठ्ठल इन्स्टिटयूट ऑफ प्रोगेसिव्ह एज्युकेशन व खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला देखील अफाट यश मिळत आहे. यामुळे राज्याचे लक्ष या तीन शैक्षणिक संकुलाकडे लागलेले असून ग्रामीण भागात असलेल्या या तीन शाळा- महाविद्यालयांनी अल्पावधीत गरुडझेप घेतली. या तिहेरी कारणामुळे डॉ. रोंगे सरांकडे शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मंडळीचे लक्ष लागले आहे तसेच त्यांना पाचही जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांतील शिक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे.
मागील साधारण वर्षभरापासून सुरू झालेल्या या काळात प्राचार्य डॉ. रोंगे सरांनी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यांत झंझावाती दौरे सुरु आहेत. विशेष म्हणजे त्यांना सर्वत्र उस्फुर्तपणे प्रतिसाद लाभत आहे. प्रत्येक शाळेत, प्रत्येक शिक्षकांना, संस्था चालकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना डॉ. रोंगे सर भेट देवून चर्चा करत आहेत. या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून यामध्ये अनेक शिक्षक संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी सरांना पाठिंबा दर्शविला आहे तसेच दौऱ्यात डॉ. रोंगे सरांच्या सोबत ते फिरताना दिसत आहेत. या भेटीमध्ये सर्व शाळांमध्ये प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी कमालीचे स्वागत करत आहेत.
मागील उमेदवारांनी काहीही केले नसल्याची भूमिका घेत आता रोंगे सरांमुळे उत्साह वाढल्याचे दिसत आहे. एकूणच डॉ.रोंगे सर यांच्या स्वेरीतील अफाट यशामुळे सर्व शिक्षकांची अपेक्षा वाढली आहे. ज्याप्रमाणे डॉ.रोंगे सर हे विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल करत आहेत त्याचप्रमाणे त्यांनी शिक्षकांचेही भविष्य उज्वल करावे, अशी अपेक्षा या निमित्ताने जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात त्यांनी माढा तालुक्यातील शाळांना भेटी देऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी कै. गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशाला माढा, महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, टेंभुर्णी, तुकाराम घाडगे विद्यालय वरवडे, विनायक विद्यालय वरवडे, न्यू इंग्लिश स्कूल उंदरगाव, माध्यमिक आश्रम शाळा केवड यांसह इतर शाळांना भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या.
आमदार होण्यापूर्वीच डॉ. रोंगे सरांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमधील एकूण २७ मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या पदोन्नतीनंतर तब्बल आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेला पदमान्यता व वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा सेवा अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिले होते.
त्या अनुषंगाने त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष साखरे यांच्या माध्यमातून प्राचार्य डॉ. बब्रुवाहन रोंगे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती, नियुक्ती व सेवा विषयक एकूण ३७ प्रकरणे सोडवली गेली आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे. या प्रकरणांच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने कार्यवाही करत एकाच दिवसात ३७ प्रकरणांची सोडवणूक करून न्याय दिला आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या कारणामुळे डॉ. रोंगे सरांच्या भेटींचे सर्वत्र स्वागत होत आहे.
या भेटी दरम्यान बोलताना डॉ.बी.पी. रोंगे सर म्हणाले की ‘आज शिक्षकांसमोर अनेक प्रश्न, अडचणी, समस्या आहेत. त्या सर्व शासन पातळीवर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. टीईटी, जुनी पेन्शन योजना अशा अनेक समस्या आहेत, त्यांचा मी बारकाईने अभ्यास केला आहे. खरे पाहता हे प्रश्न फार पूर्वी सुटायला हवे होते. परंतु उदासीनतेमुळे ते सुटलेले नाहीत. यासाठी जर आपण संधी दिली तर जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न करून असे प्रश्न सोडविण्यासाठी कोठेही कमी पडणार नाही.’ अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या कारणांमुळे सर्वत्र डॉ. रोंगे सरांना प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होते.
यावेळी प्राचार्य, मुख्याध्यापक, सहशिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आमदार होण्यापूर्वीच त्यांनी कांही प्रश्न सोडविले आहेत त्यामुळे डॉ. रोंगे सरांकडे पुणे विभागातील शिक्षक आशेने पाहत आहेत, हे मात्र नक्की जाणवते.

