पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री गौरी विसर्जन निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल, रुक्मिणी माता व महालक्ष्मी मातेस तसेच राधाष्टमी निमित्त राधिका मातेस आकर्षक व पारंपरिक सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले. सुवर्ण अलंकारांनी सजलेले देवतांचे मनोहारी, तेजस्वी व भक्तिमय रूप पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेट्या, हिऱ्याचे कंगन, बालाजी नाम शिरपेच, मोत्याचा तुरा, मोत्याच्या कंठ्या, मोहनमाळ, तुळशीची माळ, नवरत्नांचा हार, पानाड्याचा हार तसेच सोन्याचे व हिऱ्यांचे पैंजण आदी पारंपरिक सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या-तोडे, ताणवड, चिंचपेटी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची व पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी व कंबरपट्टा आदी अलंकारांनी सजविण्यात आले आहे.
महालक्ष्मी मातेस सोन्याचे गंठण, एकपदरी मोत्याची कंठी, नेकलेस, शिरपेच, अष्टपैलू मण्यांची कंठी व लक्ष्मी लॉकेट आदी अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
तसेच राधाष्टमी निमित्त राधिका मातेस नक्षी टोप, मोत्याचा कंठा, मोत्याचे मंगळसूत्र, हिरवी चिंचपेटी, ठुशी व पुतळ्यांची माळ आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
या पारंपरिक सुवर्ण अलंकारांमुळे श्री विठ्ठल, रुक्मिणी माता, महालक्ष्मी माता व राधिका मातेचे रूप अधिकच मनोहारी, तेजस्वी आणि भक्तिमय दिसत असून, हे विलोभनीय रूप भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. भाविक भक्तिभावाने देवतांचे दर्शन घेत असल्याचे माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.

