पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
गणेशोत्सव अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपला असून, यंदाच्या उत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्था तसेच पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी पुण्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी थेट मैदानावर उतरले आहेत. पुण्यात सध्या गाजत असलेल्या 'डीजेबंदी'च्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील प्रमुख गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तयारीची पाहणी केली. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अमितेश कुमार यांनी विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या
पुण्यातील गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. पुण्यातील मानाचे गणपती, साजरे केले जाणारे समाज प्रबोधनात्मक देखावे, विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी राज्यभरातून पुणे शहरात भाविक येत असतात. अशावेळी उत्सवाच्या दृष्टीने तयारी करताना प्रशासनाचा कस लागतो
मानाचा पहिला कसबा गणपतीपासून पाहणी दौऱ्याचा प्रारंभ
प्रशासनाच्या संयुक्त पाहणी दौऱ्याची सुरुवात पुण्याचा पहिला मानाचा गणपती असलेल्या 'कसबा गणपती' मंदिरापासून झाली. या दौऱ्यात पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तांव्यतिरिक्त पुण्यातील विविध झोनचे पोलीस उपायुक्त (DCP), पालिका अधिकारी तसेच पुणे मेट्रोचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते. दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांनी कसबा गणपतीसह मध्यवर्ती भागातील विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या नियमांवरून सध्या शहरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले. मिरवणूक मार्ग, खड्डेमुक्ती, वीज पुरवठा आणि रस्त्यांवरील अडथळे दूर करण्याबाबत पालिका प्रशासनाने आढावा घेतला.
त्याचबरोबर विसर्जन मिरवणूक आणि उत्सवाच्या दिवसांत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस बंदोबस्त, 'दामिनी पथक' आणि सीसीटीव्ही निगराणी तैनात करण्याबाबत चर्चा झाली. गर्दीच्या काळात आपत्कालीन वैद्यकीय मदत आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी मेट्रो व इतर वाहतूक यंत्रणांशी समन्वय साधण्यावर भर देण्यात आला.

