सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
दरवर्षी उजनी धरण 100 टक्के भरल्याचे सांगितले जाते. मात्र, धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे प्रत्यक्षात धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. सध्या उजनी धरणात सुमारे 64 टक्के गाळ असल्याने तब्बल 19 टीएमसी पाण्याची क्षमता घटली आहे, असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला.
सोलापूर येथे दिशा समितीची बैठक पार पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार मोहिते पाटील यांनी उजनी धरणातील गाळाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि वाटपावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
उजनी धरणातील गाळाबाबत यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनीही माहिती मागवली होती. मात्र, धरणातील गाळाचा प्रश्न अद्याप गंभीर असून त्याचा थेट परिणाम पाणी व्यवस्थापनावर होत आहे.
धरणाची साठवण क्षमता कमी झाल्यामुळे प्रत्येक तालुक्याला त्यांच्या गरजेनुसार आणि नियोजनानुसार पाणी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे उजनी धरणातील गाळ काढण्याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.

