सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून समाजाला वास्तवाचे भान देणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवी २०२६-२०२७ वर्षानिमित्त सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला,ड्रीम फाऊंडेशन सोलापूर, कारंडे इंटरनॅशनल स्कूल जुजारपूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पत्रकार कार्यशाळा व कृतज्ञता सोहळ्याचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
सांगोला तालुक्याच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत दिशादर्शक योगदान देणाऱ्या सर्व पत्रकारांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे.
हा एकदिवसीय कार्यक्रम जुजारपूर येथील कारंडे इंटरनॅशनल स्कूल कारंडेवाडी जुजारपूर सांगोला येथे सकाळी १०:०० ते सायंकाळी ४:०० या वेळेत पार पडेल. या विशेष सोहळ्याचे उद्घाटन आणि बीजभाषण करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार, लेखक, प्रेरक वक्ते व दैनिक सकाळचे माजी निवासी संपादक मा. अभय दिवाणजी उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे सांगोला शाखेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके भूषविणार आहेत.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०:०० वाजता नावनोंदणी आणि ओळखसत्राने होईल. सकाळी १०:३० वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सत्र आणि बीजभाषण पार पडेल. त्यानंतर दुपारी १२:०० वाजता 'चौथा स्तंभ मूल्ये आणि वर्तमान' या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर प्रमुख पाहुणे यांचे मार्गदर्शन आणि पत्रकारांसोबत खुली चर्चा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १:३० वाजता स्नेहभोजन होईल आणि त्यानंतर दुपारी २:३० ते ४:०० या वेळेत मुख्य पत्रकार कृतज्ञता सन्मान सोहळा पार पडेल.
या वैचारिक आणि कृतज्ञतापर सोहळ्यासाठी सांगोला तालुक्यातील सर्व पत्रकारांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक काशिनाथ भतगुणकी संस्थापक अध्यक्ष,ड्रीम फाऊंडेशन, सोलापूर, श्रीधर कारंडे अध्यक्ष, कारंडे इंटरनॅशनल स्कूल, जुजारपूर आणि सर्व आयोजक संस्थांचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे. या कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी समन्वयक व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे सांगोला शाखेचे प्रमुख कार्यवाह प्रा.धनाजी चव्हाण यांच्याशी-८२७५०२५१५१ या क्रमांकावर संपर्क साधावा.


