वेळापूर प्रतिनिधी जयराम घाडगे तेज न्यूज
वेळापूर पोलीस ठाणे गु.र.नं. ६७/२०१३ भारतीय दंड संहिता कलम ३०२ प्रमाणे दाखल गुन्हयातील मयत नामे दत्तात्रय मल्हारी शिंदे वय ६७ वर्षे रा. मळोली हे दिनांक २९/०८/२०१३ घरी झोपले असताना गुन्हयातील आरोपी नामे शिवाजी लक्ष्मण जाधव वय ४३ वर्षे रा. मळोली ता. माळशिरस यांनी मयताचे उजवे कपाळावर व गळयावर हत्याराने वार करून खुन केलेबाबत गुन्हा दाखल होता.
सदर गुन्हयात आरोपी नामे शिवाजी लक्ष्मण जाधव यांना सेशन कोर्ट माळशिरस यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आरोपी हा विसापूर खुले कारागृह तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे शिक्षा भोगत होता.
दिनांक २८/०७/२०२६ रोजी सिध्ददोष बंदी आरोपी नामे शिवाजी लक्ष्मण जाधव रा. मळोली ता. माळशिरस हा विसापूर खुले कारागृह श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे शिक्षा भोगत असताना नजर चुकवून जेलमधून पळून गेला होता. सदरबाबत बेलवंडी पोलीस ठाणे गु.र.नं २८८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम २६२ प्रमाणे गुन्हा दाखल होता. आरोपी पलायन झालेबाबत जेलकडून मिळाले माहीतीवरून आरोपीचे शोध कामी वेळापूर पोलीस ठाणे कडील पथक नेमण्यात आले होते.
जेलमधून पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेत असताना पलायन आरोपी हा मौजे चांदापुरी मार्गे मळोली येथे गावाकडे येत असल्याची गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाल्याने सापळा रचून जेलमधून पळून आलेल्या वरील आरोपीस शिताफीने पोलीस पथकाने पकडून पोलीस ठाणेस आणून त्यास बेलवंडी पोलीसांकडे जेलमध्ये जमा करणेकरीता व त्यांचेकडील दाखल गुन्हयाचे तपासकामी ताब्यात देण्यात आले. वेळापूर पोलीसांना जेलमधून पळून गेलेल्या आरोपीस पकडण्यात यश मिळाले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागिय पोलीस अधिकारी अकलुज संतोष वाळके यांचे मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. आशिष कांबळे, पो.स.ई. प्रणित कांबळे, तसेच वेळापूर पोलीस ठाणेकडील पोहवा /१७९८ यशवंत आनंदपुरे, पोना/५६३ साहील तांबोळी, पोना/५४६ श्रीकृष्ण पकाले, पोकॉ/१११६ गणेश माळी, पोका /१८८२ हिंगणगावकर यांनी केले आहे.

