मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा ‘हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार–२०२६’ प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते गोविंद प्रसाद नामदेव यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे.
गोवामुक्ती संग्रामाचे प्रणेते व हुतात्मा तुळशीराम बाळकृष्ण हिरवे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. समाजातील युवकांना हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची प्रेरणा मिळावी, देशप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांचा सन्मान व्हावा, हा पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे.
पुरस्काराचे वितरण सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.४५ वाजता, गोविंद नामदेव यांच्या गोरेगाव, मुंबई येथील निवासस्थानी करण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख पदाधिकारी, मान्यवर, समाजबांधव तसेच नामदेव शिंपी समाज युवक संघाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्काराचे शुभहस्ते प्रशांत शंकर बगाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई (सेवानिवृत्त), मा. राष्ट्रपती पोलीस पदक–२०१३ प्राप्त, विश्वस्त नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे तथा सचिव माऊली फाऊंडेशन, काळबादेवी, मुंबई यांच्या हस्ते होणार आहे.
गोविंद नामदेव यांची उल्लेखनीय कारकीर्द
गोविंद प्रसाद नामदेव यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD), नवी दिल्ली येथे १९७५ ते १९७८ या कालावधीत अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. NSD रिपर्टरी कंपनीसोबत त्यांनी सुमारे ११ वर्षे व्यावसायिक अभिनेता म्हणून काम केले.
‘ऑथेलो’, ‘चेरी ऑर्चर्ड’, ‘तुघलक’, ‘अंधा युग’, ‘महाभोज’, ‘पगला घोडा’, ‘पिग्मॅलियन’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी १२० हून अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
‘बँडिट क्वीन’, ‘सत्या’, ‘सरफरोश’, ‘विरासत’, ‘ओ माय गॉड’, ‘सिंघम’, ‘जॉनी गद्दार’, ‘शादी में जरूर आना’, ‘छापेकर ब्रदर्स’ आणि ‘द गांधी मर्डर’ यांसह अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत. दूरदर्शन व रंगभूमी क्षेत्रातही त्यांनी दीर्घकाळ योगदान दिले आहे.
बुंदेलखंडातील नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी २५ वर्षांहून अधिक काळ कार्यशाळा व नाटकांचे आयोजन केले आहे. त्यांनी ‘मधुकर शाह – बुंदेलखंड का नायक’ तसेच ‘बुंदेली धरती का हिंडोला’ ही नाटके लिहिली आहेत.
हिरवे गुरुजींच्या बलिदानाची प्रेरणा
हुतात्मा तुळशीराम बाळकृष्ण हिरवे गुरुजी यांचा जन्म २१ जून १९१८ रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील गारभट चिंचवली येथे झाला. शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केल्यानंतर त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.
गोवा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेत त्यांनी सत्याग्रहींच्या तुकडीचे नेतृत्व केले. १५ ऑगस्ट १९५६ रोजी तेरेखोल किल्ल्याजवळ पोर्तुगीज सैनिकांच्या गोळीबारात त्यांना हौतात्म्य आले. त्यांच्या देशसेवा व बलिदानाच्या स्मृती जपण्यासाठी हा समाजभूषण पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.
यापूर्वी ह.भ.प. श्री. निवृत्ती महाराज नामदास वारकरी, प्रसन्न वायचळ, अशोक काळे, आनंद पिंपळकर आणि डॉ. सचिन पतंगे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र तसेच नामदेव शिंपी समाज हुतात्मा हिरवे गुरुजी पुरस्कार वितरण नियोजन समिती यांच्या वतीने यंदाचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

