सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्ह्यातील जुन्या जिल्हा परिषद शाळांना नवी ओळख देण्यासाठी ‘जुनी शाळा, नवी ओळख’ हे अभियान राबवावे, अशी मागणी रावगांव येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या शितलताई कांबळे यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहेत. मात्र अनेक शाळांच्या इमारती जुन्या झाल्या असून, वर्गखोल्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, शैक्षणिक भित्तिचित्रे, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, संरक्षण भिंत तसेच शाळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची आवश्यकता आहे.
‘जुनी शाळा, नवी ओळख’ अभियानाच्या माध्यमातून या शाळांचा कायापालट करून विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देता येईल. यासाठी शासन, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, माजी विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ यांच्या लोकसहभागातून हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.
या मागणीच्या अनुषंगाने शितलताई कांबळे लवकरच सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. दीपक वैद्य तसेच राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ‘जुनी शाळा, नवी ओळख’ अभियान सोलापूर जिल्ह्यात सुरू करण्याबाबत निवेदन देणार आहेत. तसेच जिल्ह्यातील जुन्या शाळांचे सर्वेक्षण करून त्यांच्या आवश्यकतेनुसार विकास आराखडा तयार करण्याची मागणीही त्या करणार आहेत.
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच दर्जेदार आणि सुंदर शैक्षणिक वातावरण मिळाले पाहिजे. जुन्या शाळांचा कायापालट झाल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि पालकांचा जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक होईल,” असे शितलताई कांबळे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन ‘जुनी शाळा, नवी ओळख’ अभियानाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी बहुसंख्य शिक्षण प्रेमी व कार्यकर्ते उपस्थित होते.

