पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात मंगळवार, दिनांक ०७/०७/२०२६ रोजी " SAP टेक्नॉलॉजीज: इंडस्ट्री अप्लिकेशन्स अँड करिअर ऑपॉर्च्युनिटीज" या विषयावर माजी विद्यार्थि आर्यन नागटिळक यांचे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. याची माहिती विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.
प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना SAP Technologies, Enterprise Resource Planning (ERP) प्रणालीचे महत्त्व, उद्योगांमध्ये SAP चा विविध विभागांमध्ये होणारा वापर तसेच आधुनिक उद्योग व्यवस्थापनामधील SAP चे योगदान याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच SAP क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी, आवश्यक तांत्रिक व व्यावसायिक कौशल्ये, SAP सर्टिफिकेशनचे महत्त्व आणि उद्योगाच्या गरजेनुसार स्वतःची तयारी कशी करावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख वक्ते श्री. आर्यन नागटिळक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी विभागातील प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. सोनाली गोडसे, प्रा. स्वप्निल टाकळे यांच्यासह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

