खडकी, पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
श्रीराम मंदिर देवस्थान, खडकी यांच्या वतीने नुकताच मंदिर परिसरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात पंचक्रोशीतील विविध शाळांमधील ६० गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम मंदिर देवस्थानचे आधारस्तंभ पुण्यातील कुंदन स्पेसेस चे संचालक व मंदिराचे आधारस्तंभ भंवरलालजी जैन उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते महेशजी चासकर तसेच श्रीराम मंदिर देवस्थानचे मुख्य विश्वस्त नरेंद्र बागनाईक व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळावी, तसेच समाजात शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष नरेंद्र बागनाईक, सचिव संजय टेकाडे, खजिनदार स्नेहल पृथ्वीराज, विश्वस्त प्रशांत पृथ्वीराज, मिलिंद पोत्रे राकेश पटेल, प्रवीण अय्यावार, अनिकेत अय्यावार, विजय टेकाळे, आणि सर्वजीत बागनाईक यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वर्गीय विवेक वामनराव शिंदे स्मृतिचिन्ह विशेष विद्यार्थ्यांना देण्यात आले.
कार्यक्रमानंतर पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "श्रीराम मंदिर ही धार्मिक संस्था असूनही पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने योगदान देत आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणारे, त्यांना प्रोत्साहन देणारे आणि शिक्षणाची प्रेरणा देणारे असे स्तुत्य उपक्रम श्रीराम मंदिर देवस्थान सातत्याने राबवत असल्याबद्दल आम्हा पालकांना मनापासून अभिमान व आनंद वाटतो."
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीची प्रेरणा अधिक दृढ होऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

