बार्शी प्रतिनिधी तेज न्यूज
पत्रकारांच्या न्याय, हक्क आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने आणखी एक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. पत्रकारांच्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करणाऱ्या प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून बार्शीतील पत्रकार सचिन अपसिंगकर यांच्या डोळ्याच्या उपचारासाठी आर्थिक मदतनिधीचे वितरण दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता, शब्दरंग, श्री शिवाजी नगर, बार्शी याठिकाणी करण्यात येणार आहे.
हा मदतनिधी सोलापूर विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार असून, संघटनेचे संस्थापक, ज्येष्ठ संपादक राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. पत्रकारांच्या कल्याणासाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या संघटनेच्या या उपक्रमाचे पत्रकार व सामाजिक क्षेत्रातून स्वागत होत आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने पत्रकारांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. पत्रकारांच्या आरोग्य, न्याय आणि हक्कांसाठी संघटना सातत्याने कार्यरत असून, गरजू पत्रकारांना आधार देण्याचा हा आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे.
या कार्यक्रमास संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बसवंत यांनी केले आहे.

