माढा प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते दयानंद महाविद्यालय, सोलापूर येथील भूगोल विभागप्रमुख डॉ.वीरभद्र दंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक बांधिलकी, मानवता, देशप्रेम आणि राष्ट्राच्या विकासाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यास मदत होते, असे प्रतिपादन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी ‘स्वतःपासून समाज आणि समाजातून राष्ट्राच्या विकासाकडे’ जाण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी स्वीकारावी, असे आवाहन केले. युवकांनी समाजातील विविध प्रश्नांविषयी संवेदनशील राहून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सेवा, शिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव विकसित करण्याची संधी मिळते, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. घन:शाम हराळे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी, “शिक्षणाच्या माध्यमातूनच सक्षम युवा वर्ग घडतो. सक्षम युवा वर्ग घडला तर देशाचे भविष्य उज्ज्वल होऊन शक्तिशाली राष्ट्रनिर्मितीस हातभार लागतो,” असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करून घ्यावा तसेच समाजसेवेची भावना आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो.डॉ. दत्तात्रय काळेल यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे, उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील तिचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा मस्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सुरेश धडस यांनी केले.
या कार्यक्रमास डॉ. रविराज कांबळे डॉ. अलका घोडके, डॉ. संगीता पैकेकरी, डॉ. पंकज ढमाळ, डॉ. सतीश घाडगे, प्रा. मयूर चव्हाण, प्रा.समाधान कदम डॉ. वंदना कवितके, प्रा. सुषमा राऊत यांच्यासह विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

