पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
तांदूळवाडी ता. माळशिरस येथे झालेल्या पिकअप वाहनाच्या भीषण अपघातात पंढरपूर तालुक्यातील मृत्युमुखी पडलेल्या आठ जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर झालेल्या आर्थिक मदतीचे धनादेश व मंजुरीपत्रे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.
या दुर्दैवी दुर्घटनेत एका कुटुंबातील आठ निष्पाप जीवांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आमदार समाधान आवताडे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये याप्रमाणे एकूण ४० लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली.
यावेळी आमदार आवताडे यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आर्थिक मदत त्यांच्या दुःखाची भरपाई करू शकत नसली तरी या कठीण प्रसंगी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. भविष्यात आवश्यक त्या सर्व शासकीय मदतीसाठी सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी प्रणव परिचारक, द्रोणाचार्य हाके, नगरसेवक राहुल शिंदे-नाईक, रोहित पानकर आणि तमीम सय्यद उपस्थित होते.


