हिरडगाव प्रतिनिधी तेज न्यूज
गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड, हिरडगाव (युनिट क्रमांक ०४) येथे गळीत हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीचा महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या मिल रोलर पूजन समारंभाचे आयोजन गुरुवार दिनांक १८ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन मा. श्री. बाबुराव बोत्रेपाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा समारंभ पार पडला. यावेळी ओंकार शुगर ग्रुपचे संचालक मा. श्री. ओमराजे बाबुराव बोत्रेपाटील यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून गळीत हंगाम २०२६-२७ च्या कामांना प्रारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मा. श्री. ओमराजे बाबुराव बोत्रेपाटील यांनी सांगितले की, शेतकरी, कामगार आणि उद्योग यांच्यातील समन्वयाच्या बळावर ओंकार शुगर ग्रुपने अल्पावधीतच साखर उद्योगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम व्यवस्थापन आणि शेतकरी हिताला प्राधान्य देत आगामी गळीत हंगाम अधिक यशस्वी करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. गळीत हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीचा आढावा घेत कारखान्यातील यांत्रिक दुरुस्ती, देखभाल व आवश्यक कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती दिली. आगामी हंगामात अधिक क्षमतेने व कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्यासाठी कारखाना सज्ज राहील असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर , सर्व खातेप्रमुख/विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवीन गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
मिल रोलर पूजनामुळे कारखान्याच्या गळीत हंगामाच्या तयारीला औपचारिक सुरुवात झाली असून, आगामी हंगामात शेतकऱ्यांना उत्तम सेवा, वेळेवर ऊस गाळप आणि उद्योगाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कारखाना कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला.


