काळजातील भगदाड
ज्या भारतीय संस्कृतीमध्ये माता सरस्वती , माता अन्नपूर्णा , माता लक्ष्मी , माता दुर्गेची पूजा केली जाते , नवरात्रीमध्ये कुमारीका मुलींचे पाय धुवून आशीर्वाद घेतले जातात , त्यांचे पूजन केले जाते , अशा आपल्या या सुसंस्कृत देशामध्ये , राज्यामध्ये पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर मध्ये निरागस निष्पाप चार वर्षीय मुलीवर 65 वर्षाच्या व्यक्तीने खाऊचे आमिष दाखवून तसेच त्या मुलीला गाय वासरू आवडायचे म्हणून गोठ्यात नेऊन अत्यंत निर्दयीपणे मुलीच्या तोंडात सॉक्सचा बोळा कोंबून जो घृणास्पद , लांच्छनास्पद प्रकार केला , संपूर्ण शरीरावर मारहाण केली , शेवटी दगडाने ठेसून तिची हत्या केली आणि शेणाच्या ढिगार्याखाली तिचा मृतदेह लपवून ठेवला . अशा माणुसकीला काळिंबा फासणारी , निषेध या शब्दाला सुद्धा लाज वाटावी , ज्या ठिकाणी क्रूरतेचा अंत व्हावा , अशा घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो .
बालपणाचे जे वय आनंदाने खेळण्याचे , हसण्याचे , आई-वडिलांपाशी खाऊ साठी प्रेमाने हट्ट धरण्याचे , आनंदी जीवन जगण्याचे सोनेरी बालपण त्या विकृत मानसिकतेच्या नराधमाने नष्ट केले , अशा नराधमाला यापुढे एक सेकंद सुद्धा जगण्याचा अधिकार नाही . पूर्वी सुद्धा त्यांने मोठ्या महिलांसोबत कोयत्याचा धाक दाखवून असे गुन्हे केलेले आहेत , शिक्षा भोगून आलेला आहे , अशी सुद्धा माहिती समोर आलेले आहे , अशा प्रकारच्या नीच प्रवृत्ती वेळच्या वेळीचं ठेचून काढल्या पाहिजेत .
अशा नराधमाला फक्त आणि फक्त लवकरात लवकर फाशीची शिक्षा पुरेशी नसून एका मोठ्या लोखंडी ड्रम मध्ये त्याला घालून थेट चितेवरं त्याच ठिकाणी ठेवा , ज्या गोठ्या मध्ये त्यांने अत्याचार केला . त्यावेळेसचा तो प्रसंग कल्पना स्वरुप आपण आपल्या डोळ्यासमोर जरी आणला तर त्या लेकराला किती वेदना झाल्या असतील , किती त्रास झाला असेल आणि मी का जन्माला आली असेल , असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण झाले असतील . अशा नीच प्रवृत्तीच्या , विकृत कृतीमुळे घराघरातील प्रत्येक मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आई वडील सुद्धा धास्तावलेले आहेत .
एकंदरीतच परिस्थिती हाताबाहेर जात आहे . त्या विकृत नराधमाला शक्य तेवढ्या लवकर अत्यंत वेदनादायी मृत्युदंड टीव्हीवर थेट प्रक्षेपणाद्वारे देण्यात यावा , जेणेकरून भविष्यात कोणत्याही नराधमाच्या मनात असा विचार सुद्धा आला नाही पाहिजे , अन्यथा भविष्यात असे अनेक नराधम लपून बसलेले आहेत , जे भविष्यात उघड होतील , त्यावेळेस आपल्याचं लेकरांचेच जीव जातील..
आपल्या प्रत्येकाला लेकरं आहेत , मुली आहेत आणि ती आपल्या सर्वांची आहेत . त्यांच्या रक्षणासाठी आता
हीचं ती वेळ हाच तो क्षण ...
काल शनिवारी संध्याकाळी पंढरपूर मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जो निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता , त्यामध्ये मी पंढरपूरकर म्हणून सामील झालो होतो , त्या ठिकाणी मुलीचे मामा उपस्थित होते , त्यांना जड अंतकरणाने मिठी मारली , सांत्वन केले परंतु मला माहित आहे की , केवळ सांत्वनाने हा विषय संपणार नाही , त्या निष्पाप , गोंडस , सोनपरीचे हसणे , आनंदाने बागडणे आम्ही परत देऊ शकत नाही .
त्यामुळे त्या नराधमाला फाशीपेक्षाही अत्यंत कठोरात कठोर विचित्र पद्धतीचा मृत्युदंड देण्यात यावा , तरचं समाजातील मुली आणि महिलांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल...
त्या निष्पाप निरागस सोनपरीची मी माफी मागतो , तिला जड अंतकरणाने श्रद्धांजली वाहतो.. बाळा , आम्हाला माफ कर . सोनपरीच्या कुटुंबाची मी माफी मागतो ... ते केवळ तुमचे दुःख नसून ते आम्हा सर्वांचे दुःख आहे . आमच्या काळजामध्ये झालेली खोल जखम आहे , समाजातील कोणतीही मुलगी आमची सुद्धा मुलगी आहे . तिचे संरक्षण करणे आमची सुद्धा जबाबदारी आहे .
संध्याकाळी एखादी मुलगी , महिला रस्त्यावरून जात असताना एखादा पुरुष थोड्याफार अंतराने पुढे मागे असेल , तर त्या महिलेला वाटले पाहिजे की हा अनोळखी माणूस माझा भाऊ आहे , तो माझा संरक्षक आहे अशा पद्धतीची जबाबदारी सुद्धा आम्हा पुरुषांवर आहे .
नसरापूर घटनेचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो . जड अंतकरणाने येथेच थांबतो.
श्री. क्षेत्र पंढरपूर
लेखक - विशाल केशव धट


