पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
“लोकमान्य विद्यालयाचे विद्यार्थीप्रिय व आदर्श शिक्षक स्व. आप्पासाहेब चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतानाच त्यांच्यावर सुसंस्कार केले आहेत. त्याचबरोबर परिसरातील व्यक्तींनाही विविध क्षेत्रातील प्रगतीसाठी मार्गदर्शन केले आहे.” असे मत कर्मयोगी सु. रा. परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूरचे अध्यक्ष, सोलापूर जिल्ह्याचे मा. आमदार प्रशांतराव परिचारक यांनी व्यक्त केले. ते येथील स्व.आप्पासाहेब चव्हाण सर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्व. आप्पासाहेब चव्हाण सर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त स्मृती पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण समारंभामध्ये बोलत होते. पुढे बोलताना प्रशांतराव परिचारक म्हणाले - “समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान व सत्कार करावा हे स्व. आप्पासाहेब चव्हाण सर यांचे संस्कार अमरसिंह चव्हाण, अमोल चव्हाण आणि प्रतापसिंह चव्हाण ही तीनही मुले सातत्याने करतात ही एक चांगली आणि महत्वाची बाब आहे.”
यावेळी व्यासपीठावर पंढरपूर पंचायत समिती मा. सभापती वामनराव माने, प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, जि. प. सदस्य सुभाषराव माने,अमोल हरीशदादा गायकवाड ,सौ.सुनीता पंडितराव देशमुखश्रीमती सुवर्णा आप्पासाहेब चव्हाण
आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माढा तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल मा.पंडितराव तुकाराम देशमुख यांचा प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला.तसेच मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक शिवाजीराव बागल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जि. प. प्रा. शाळा तावशीचे विष्णुपंत गावडे आणि सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सोलापूरच्या सौ. शांताताई क्षीरसागर यांचाही शाल, पुष्पहार, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.
तसेच चि. समर्थ दत्तात्रय रोंगे, चि. संघर्ष लखन छापछडी, कु. स्वरा महादेव शिंदे, कु. वैष्णवी गणेश सुतार, कु. श्रेया सचिन गवळी, कु. यशस्वी धनंजय नांदरे, कु. उपासना सचिन कुंभार आणि कु. श्रुती सज्जन पुरी या आदर्श विद्यार्थ्यांचाही स्मृतिचिन्ह व शालोपयोगी वस्तूंचा संच देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.
सर्व सत्कारमूर्तींच्या वतीने सत्काराला प्रातिनिधिक स्वरूपात उत्तर देताना व स्व. आप्पासाहेब चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देत प्राचार्य शिवाजीराव बागल म्हणाले - “ स्व. आप्पासाहेब चव्हाण सर यांनी असंख्य विद्यार्थ्यांना जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य केले. मीही त्यांचा विद्यार्थी आहे याचा मला विशेष अभिमान वाटतो.”
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख म्हणाले - “स्व. आप्पासाहेब चव्हाण हे स्वतः चारित्र्यसंपन्न होते आणि त्यांच्या रोजच्या वागण्यातून बोलण्यातून ते संस्कृतीचे व सुसंस्काराचे मूर्तीमंत उदाहरण होते.”
याप्रसंगी बोलताना सत्काराला उत्तर देताना माढा पंचायत समितीचे सभापती मा. पंडितराव देशमुख म्हणाले - “कोणत्याही क्षेत्रामध्ये कष्टाला पर्याय नाही. कष्ट केल्यावर यश हे हमखास मिळत असते. कष्ट आणि सामाजिक कार्य याचे त्यांना फळ मिळाले आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. वामनराव माने सर त्यांच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले - “स्व. आप्पासाहेब चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करतानाच सुसंस्कार केले. शिवाय पालक म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलांवरती सुसंस्कार केले. ज्याप्रमाणे स्व. आप्पासाहेबांनी मुलांच्यावर सुसंस्कार केले तसेच सुसंस्कार प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांवर करावेत. त्यामुळे आई वडिलांप्रमाणेच समाज आणि साक्षात परमेश्वरालाही आनंद होतो.”
सोलापूर जिल्ह्यातील साहित्यिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, विधीज्ञ, व्यापार, पत्रकारिता, वैद्यकीय, कला, क्रीडा, उद्योग, शैक्षणिक, सांस्कृतिक या व इतर क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थित उपस्थितीत संपन्न झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये कैलास कारंडे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. प्रतापसिंह चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा परिचय ज्ञानेश्वर मोरे यांनी करून दिला. डॉ. सचिन लादे यांनी सूत्रसंचालन केले तर मंदार केसकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
हा पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करण्यासाठी राणा प्रताप ग्रुप,वैष्णव मेळा मित्रपरिवार यांनी विशेष प्रयत्न केले.


