पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालयात विविध शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या सेवानिवृत्ती निमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात वरिष्ठ विभागातील कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, कनिष्ठ विभागातील प्रा. महादेव जेधे, प्रा. राजेंद्र पाटील, सौ. कमल शिंदे तसेच प्रयोगशाळा परिचर परमेश्वर बनसोडे यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव तथा जनरल बॉडी सदस्य प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव, माजी सहसचिव प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे हेही मान्यवर म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव हे होते.
प्रमुख पाहुणे डॉ. जाधव यांनी आपल्या मनोगतात ‘हा सोहळा कृतज्ञतेचा असल्याचे सांगून, सेवकांनी दिलेल्या योगदानामुळे संस्थेचा नावलौकिक वाढल्याचे नमूद केले. सेवाकाळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते, तरीही त्यांनी निष्ठेने काम करत संस्थेची परंपरा जपली, असे त्यांनी सांगितले. रयत संस्कृती ही बंधुभाव, प्रेम, सहिष्णुता व समानता या मूल्यांवर आधारलेली असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले’.
प्राचार्य, डॉ. के. एच. शिंदे यांनी ‘सेवकांच्या त्यागातूनच रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष बहरल्याचे सांगितले. ग्रामीण व दुर्गम भागात कार्य करताना सेवकांनी अनेक अडचणींवर मात करत शिक्षणाची सेवा दिली, असे त्यांनी नमूद केले’.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी ‘सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या जाण्याने निर्माण होणारी पोकळी भरून काढणे आव्हानात्मक असल्याचे सांगितले. नवीन पिढीने हा वारसा पुढे नेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक व सेवकांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव, संस्थेबद्दलची कृतज्ञता तसेच सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याची आठवण सांगितली. त्यांच्या मनोगतातून भावनिक वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, डॉ. चंद्रकांत काळे, प्रा. राजाराम गोडसे, प्रा. वर्षा गारोळे, कार्यालयीन प्रमुख चौरंगनाथ वाघमारे, डॉ. रामदास नाईकनवरे, कु. आकांक्षा जेधे, स्वप्निल व्हटकर आदींनीही मनोगते व्यक्त केली. तसेच सांगली येथील दलित चळवळीचे नेते प्रा. सुकुमार कांबळे, प्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे, प्राचार्य डॉ. तानाजी लोखंडे, पुणे ग्रामीणचे डी. वाय. एस. पी. मनोजकुमार यादव, पत्रकार जैनुद्दीन मुलानी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक कल्याण समितीचे चेअरमन डॉ. उमेश साळुंखे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. रोहिणी बावस्कर, प्रा. दिपाली माने व प्रा. योगिता खपके यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन प्रा. महेश कोंडुभैरी यांनी मानले.
समारंभात सेवानिवृत्त सेवकांचा पुष्पगुच्छ, पुष्पहार, शाल, श्रीफळ व चांदीचे नाणे देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

