पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
खरं तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना अधिवेशनाची निमंत्रणं यासाठी द्यावी लागतात की, ते आले तर आपली दु:ख, वेदना, प्रश्न त्यांच्या कानी घालता येतात..
प्रश्न त्याच्या कानी घालून सुटतात की नाही हा भाग वेगळा असला तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आल्यानं नक्कीच वातावरण तयार होतं..ज्या गावात अधिवेशन असतं तेथील प्रशासन कामाला लागतं, कचरयाचे ढीग, रस्त्यावरील खड्डे भरले जातात, गावं स्वच्छ होतं. हे सारं होत असलं तरी चौथ्या स्तंभाची गाऱ्हाणी ऐकायलाही राज्याच्या कारभारयांना वेळ नसेल तर मग त्यांना निमंत्रणं तरी का द्यायची? बघा,
अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार संजय बनसोडे यांच्यासह अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची टीम तीन आठवड्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना भेटली..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
अधिवेशनाला नक्की येतो..
आम्ही तशी तयारी केली..
आठ दिवसांनी निरोप आला,
मुख्यमंत्र्यांना जमणार नाही..
देवेंद्र फडणवीस नांदेड अधिवेशनास आले नाहीत, शेगावला आले नाही, गंगाखेडच्या एका कार्यक्रमास येतो म्हणून आले नाहीत आणि उदगीरच्या अधिवेशनास शब्द देऊनही पाळला नाही..
पत्रकारांबद्दल राज्यकर्त्यांना एवढी अँलरजी का? कळायला मार्ग नाही..
उपमुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे यांचंही असंच..
आम्ही दरे गावाला जाऊन त्यांना निमंत्रण दिलं..
दरे गावाला जाणं एक दिव्य असतं..
सातारयावरून कास मार्गे खराब रस्त्यावरून दीड तास प्रवास करावा लागतो..
पुढे अर्धा तास बोटीतून जावं लागतं.. नंतर अंगावर येणारा डोंगर चढून एक किलो मिटरची पायपीट करावी लागते..
नंतर साहेबांचा बंगला लागतो.. रखरखत्या उन्हात हे दिव्य आम्ही पार पाडून साहेबांनी दिलेल्या वेळेत म्हणजे सकाळी दहा वाजता दरेला पोहोचलो..
तिथं साडेतीन तास वेटिंग करावी लागली..
आयुष्यात मी कधी कोणाच्या दारात एवढा वेळ बसलो नाही.. दुर्दैवानं अ. भा. मराठी पत्रकार परिषदेसाठी, राज्यातील पत्रकारांसाठी मला हे सारं सहन करावं लागलं..
साहेब 1.40 वाजता भेटले, म्हणाले नक्की येतो..
पत्रिका छापल्या , बातम्या आल्या, होर्डिंग्ज लावल्या.. साहेबांना मोठी प्रसिध्दी मिळाली..
मात्र ते आले नाहीत..
पिंपरी - चिंचवड अधिवेशनाच्या वेळेसही असंच घडलं.. त्यांना उद्घाटलनास यायचं होतं,कोणी तरी कान भरले.. ते परत गेले.. अडीच हजार पत्रकार उपस्थित आहेत म्हटल्यावर दुसरे दिवशी ते आले..
का करतात हे नेते असं?
यायचं नसेल, एखादी व्यक्ती, संघटनेबद्दल पूर्वग्रह असतील तर त्यांनी निमंत्रण देतानाच स्पष्ट सांगायला हवे.. तसं ही मंडळी का करीत नाही? "येतो म्हणायचं आणि ऐनवेळी दांडी मारायची हे योग्य आहे का?
नियोजित पाहुणे आले नाहीत तर संयोजकांना कोणत्या दिव्याला, मनस्तापाला सामोरं जावं लागतं याची कल्पना या नेत्यांना असण्याचं कारण नाही.. आपल्या मुळं संयोजक अडचणीत आले याचं सुख, दु:खही नाही..
न येण्याचं कारण कळविणयाचंही सौजन्य नाही..
हे असं सारं..
आमच्या उदगीर अधिवेशनास शब्द देऊनही
मुख्यमंत्री आले नाहीत,
उपमुख्यमंत्री आले नाहीत
काय अडलं आमचं?
अधिवेशन दिमाखदार झालं..
परिसंवाद, चर्चा, मुलाखती सारं काही यथासांग पार पडलं.. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांची साधी आठवण देखील कोणी काढली नाही.. याचं कारण प्रमुख पाहुणा कोण आहे हे पाहून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य अधिवेशनास येत नाहीत, संस्थेवरचं प्रेम आणि माझ्यावरच्या विश्वासापोटी ते येतात..
त्यामुळंच कोण आलंय, आलं नाही याच्या चर्चेचा प्रश्न नसतो.. वर म्हटल्या प्रमाणे आमचं काही अडलं नाही, पण हजारो पत्रकारांसमोर व्यक्त होण्याची, सरकारच्या ध्येय, धोरणावर भाष्य करण्याची मोठी संधी या नेत्यांनी गमविली ..
मी दाव्यासह सांगू शकतो की, सरकारने कितीही पैसा खर्च केला तरी परिषदेच्या अधिवेशनास जेवढे पत्रकार येतात तेवढे सरकारला कधीच एकत्र जमा करता येणार नाहीत.. त्यामुळे एका प्रभावशाली वर्गासमोर येऊन काही सांगण्याची आमचे अधिवेशन ही संधी असते ती गमविली जात असेल तर
कधी तरी अशी वेळ यामंडळींवर येईल की,
याचा नक्की त्यांना पश्चाताप होईल..
येतो म्हणून, वारंवार संपर्क करूनही श्री. देवेंद्र फडणवीस किंवा श्री. एकनाथ शिंदे का आले नाहीत असा प्रश्न कोणी विचारला तर त्याची दोन उत्तरं असू शकतात..
एक म्हणजे ग्रामीण पत्रकारांबद्दल सरकारची तुच्छतेची भावना अथवा कोणी कानही भरलेले ही असू शकतात..
परिषदेचा कार्यक्रम जाहीर झाला रे झाला की अनेक विरोधी शक्ती सक्रीय होतात,,
त्यातूनही असे घडू शकते..
नेमकं काय घडलं, याचं उत्तर हे नेतेच देऊ शकतात..
असो हरकत नाही..
अधिवेशनास लातूरचे पालकमंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकारमंत्री श्री. बाबासाहेब पाटील, लोकमत समुहाचे मुख्य संपादक राजेंद्र बाबू दर्डा, स्थानिक आमदार संजय बनसोडे यांच्यासह आमच्या सर्व वक्यांनी शब्द पाळला त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता आहेच.. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सुधीर जगताप यांचे विशेष आभार.. त्यांनी आमचे अधिवेशन यशस्वी करण्यात मोठा हातभार लावला..
एक गोष्ट कबूल करावी लागेल..
मागील पाच अधिवेशनाएवढी उपस्थिती उदगीरला नव्हती.. पहिल्या दिवशी फक्त 1500 पत्रकारांची नोंद झाली..अधिवेशनाची तारीख निवडण्यात माझी चूक झाली.. हे मी मान्य करतो.. अक्षयतृतियाच्या सणाचा एवढा फटका बसेल याची कल्पना नव्हती.. तो बसला याशिवाय उन्हाळा, थोडं आडमार्गावरचं गाव ही कारणंही आहेत.. त्याबद्दल सुषमाताईं अंधारे यांनी आम्हाला जे डोस पाजले त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद द्यावे लागतील.. सचिन शिवशेट्टे, युवराज धोतरे, मद्देवाडकर या मित्रांनी एकहाती हे अधिवेशन यशस्वी करून दाखविले.. त्यांनाही धन्यवाद..
एस.एम.देशमुख

