पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने दि. ३० मार्च २०२६ रोजी ‘सिविकॉन ३.०’ या तांत्रिक महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इनचार्ज डॉ.एम.एम.पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. पी. आर. बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एम. पवार यांच्या उपस्थितीत विभागातील प्राध्यापकांच्या सहकार्याने हा उपक्रम संपन्न झाला.
या ‘सिविकॉन ३.०’ मध्ये आयडीयाथॉन, सॉईल आर्ट, अॅप्टि टेक मास्टर, सिने टेक मास्टर, पोस्टर प्रेझेंटेशन आणि कॅड रेस यांसारख्या विविध तांत्रिक व सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांच्या सहकार्यामुळे ‘सिविकॉन ३.०’ या उपक्रमातील सर्व स्पर्धा व तांत्रिक सत्रे यशस्वीरीत्या पार पडली. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला व बुद्धिमत्तेला चालना मिळाली असून याचा विद्यार्थ्यांना भविष्यात फायदा होणार आहे, हे मात्र निश्चित! या स्पर्धेमध्ये राज्यातील इतर इंजिनिअरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांसह जवळपास २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
प्रा. एम. व्ही. डोंगरे यांनी सेसा समन्वयक म्हणून काम पहिले. उत्तम नियोजन, सक्षम व्यवस्थापन, स्पर्धांचे यशस्वी आयोजन हे समितीमधील सर्व सदस्यांचे कौशल्य ठरले. सर्व विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. ‘सिविकॉन ३.०’ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व अत्यंत यशस्वी ठरला.

