पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्था संचलित कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी सचिव तथा सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव उपस्थित होते. तसेच जनरल बॉडी सदस्य अमरजीत पाटील, अॅड. गणेश पाटील व ज्योतीराम भायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे डॉ. जे. जी. जाधव यांनी आपल्या भाषणात, " पारितोषिक वितरण हा केवळ कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कष्टांचा उत्सव असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेवून सातत्याने प्रयत्न करावेत, अपयशाची भीती न बाळगता पुढे वाटचाल करावी", असे आवाहन त्यांनी केले. “लहान ध्येय ठेवणे हीच खरी चूक असून मोठ्या उद्दिष्टांसाठी प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद करत सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी महाविद्यालयातील ऊर्जावान वातावरण, सक्षम शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग यामुळे संस्थेची प्रगती होत असल्याचे सांगितले. महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान, क्रीडा व वाङ्मय महोत्सवांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना व्यापक संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असून शिक्षणासोबत कौशल्यविकास व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जात आहे,” असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदव्युत्तर विभागाचे अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय जिमखाना समितीचे प्रमुख डॉ. उमेश साळुंखे यांनी करून दिला. यावेळी मंचावर कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. राजेश कवडे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य व अधिष्ठाता डॉ. सुशीलकुमार शिंदे, कला विभागाचे अधिष्ठाता डॉ. समाधान माने, विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे व प्रा. विठ्ठल फुले आदी मान्यवर उपस्थित होते.
या समारंभात राष्ट्रीय, विभागीय व विद्यापीठ स्तरावर विविध कला व क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पीएच.डी., पेटंट व विविध पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुबेर गायकवाड व प्रा. रोहिणी बावचकर यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन प्रा. डॉ अमर कांबळे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागांचे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

