पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी (पंढरपूर) येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत “अविनाशी तपासणी तंत्रज्ञान” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा दि. १३ व १४ मार्च २०२६ रोजी यशस्वीरीत्या पार पडली. ही कार्यशाळा पुणे येथील इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या अविनाशी तपासणी तंत्रज्ञानाची ओळख करून देणे व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करणे हा होता. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना अल्ट्राध्वनी तपासणी, चुंबकीय कण तपासणी, द्रव प्रवेश तपासणी तसेच किरणोत्सर्गीय तपासणी या महत्त्वाच्या तपासणी पद्धतींबाबत सविस्तर माहिती व प्रात्यक्षिके देण्यात आली.
या कार्यशाळेसाठी उद्योग क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पुणे येथील एम्पिरिकल टेक्नोक्रॅट्स संस्थेचे तांत्रिक संचालक श्री. चिंतामणी एम. खाडे, प्रोफिशियंट एनडीटी संस्थेच्या संस्थापक सौ. संगीता कापोटे तसेच प्रदीप एनडीटी प्रॉडक्ट्स प्रा. लि., पुणे येथील संचालक श्री. कलेश अशोक नेरुरकर यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तपासणी तंत्रज्ञानाची सखोल माहिती दिली.
सौ. संगीता कापोटे या अमेरिकन वेल्डिंग सोसायटीकडून प्रमाणित वेल्डिंग निरीक्षक म्हणून मान्यता मिळवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला असून, त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योगातील गुणवत्ता नियंत्रण व तपासणी प्रक्रियेचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगितले.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना विविध तपासणी पद्धतींचे सैद्धांतिक ज्ञान तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे उद्योगात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची ओळख करून देण्यात आली. त्यामुळे गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन सुरक्षितता आणि औद्योगिक तपासणी प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण ज्ञान प्राप्त झाले.
या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. अतुल कुलकर्णी आणि प्रा. ओंकार ठिगळे यांनी नियोजनपूर्वक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. हा उपक्रम यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी तसेच प्राचार्य डॉ. कैलाश ज. करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख तांत्रिक ज्ञान, आधुनिक तपासणी तंत्रज्ञानाची ओळख आणि प्रत्यक्ष कौशल्यांचा अनुभव मिळाला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी अधिक सक्षम होऊन उद्योगक्षेत्रात यशस्वीपणे कार्य करू शकतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. शेवटी प्रमुख मार्गदर्शकांचे आभार मानून कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

