वलसाड (गुजरात) प्रतिनिधी प्रमोद सूर्यवशी तेज न्यूज
रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी, भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच आयोजित गुजरातमधील वलसाड येथे साहित्यिकांची मांदियाळी उत्साहात साजरी करण्यात आली. मंचातर्फे समूहाचे चौथे राष्ट्रीय कविसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा तिथंल समुद्रकिनारी, स्वामीनारायण मंदिराच्या सहवासात स्थित नयनरम्य वातावरणात अक्षरमहोल सभागृहात मोठ्या दिमाखात संपन्न झाले.
समूहाच्या संस्थापिका भाग्यश्री राकेश बागड, संयोजक राकेश बागड आणि आयोजक प्रदीप बडदे यांनी मराठी साहित्यात महत्त्वाचे पाऊल उचलत, गुजरातसारख्या राज्यात तिसऱ्यांदा मराठी भाषेचा गौरव केला. कार्यक्रमाची संकल्पना पाहता नवोदित कवी-कवयित्रिंना साहित्यिक मंच उपलब्ध करून देऊन त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी चौथ्या राष्ट्रीय कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध गितकार, लोककवी प्रशांत मोरे तसेच उद्घाटक शरद चितोडकर व स्वागताध्यक्ष डाॅ.चंद्रकांत कोठावदे असे नामवंत व्यक्तीमत्व लाभले होते. साहित्यिकांसाठी ही एक पर्वणीच होती. नितीन वायाळ, .संदीप राक्षे, संजय आहेर, माणिकराव गोडसे, प्रकाश फर्डे या मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली होती.
संमेलनाचे अध्यक्ष मा.प्रशांतदादा मोरे यांचे मनोगत साहित्यिकांसाठी मार्गदर्शनपर आणि प्रबोधक असे ठरले. गीतलेखन आणि काव्यलेखनाला पूरक असलेल्या बाबी त्यांनी आपल्या कणखर भाषणातून नमूद केल्या. त्यांच्या कवितांनी हळव्या मनाचा ठाव घेत रसिकांना मंत्रमुग्ध केले. पहिल्या सत्रात कवयित्री उज्ज्वला कोल्हे यांच्या आठवणींच्या शब्दकळा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करून त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय कविसंमेलनात बहारदार कविता, गझल, पोवाडा, बालगीत, भावगीत, वृत्तबद्ध, छंदोबद्ध आणि मुक्तछंद अशा जीवनाचे वेगवेगळे पैलू मांडणाऱ्या कविता सादर झाल्या. कवी-कवयित्रींनी उत्तमोत्तम कवितांचे उत्साहपूर्वक वातावरणात सादरीकरण केले. संमेलनात चौघडावादक रमेश पाचंगे, तुतारीवादक भरत पाचंगे व शंखवादक गजानन जावरकर या कलाकारांनी आपली कला सादर करत मैफिलीत उत्साह आणला.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राची सुरूवात अनुकूल माळी यांनी त्यांच्या बहारदार शैलीने काळजाचा ठाव घेत प्रेक्षकांची मने वेधून घेतली, त्याचबरोबर गोविंद पारकर, कल्पना देशमुख, आनंद ढाले, ज्योती राखुंडे, प्रमोद सुर्यवंशी, गोरख पालवे या कवींनी सादर केलेल्या रचना वेगळ्या उंचीच्या ठरल्या असे अध्यक्षांनी सत्राच्या अखेरीस व्यक्तव्य केले.
दुसऱ्या सत्रात राहुल भोवते, हरिश्चंद्र दळवी, दक्षा संखे, वीर देसाई, मीना ठाकोर, संतोष चिले, महेश अडगुलवार, मनोहर पवार, मंजु राजेजाधव, नवीनकुमार कारेमोरे, यशवंत पगारे, संदेश वाघमारे, साईनाथ रहाटकर, विजय पिलकर, अर्जुन बांबेरे, संजय हिवाळे अशा एकूण ४० कवी-कवयित्रींनी आपल्या सुंदर कविता सादर केल्या.
सर्व कवी, कवयित्रींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्नेहल येवला व बाळासाहेब गिरी यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली. साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करत भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंचाने मोलाची कामगिरी बजावली असे संमेलनाध्यक्ष प्रशांत मोरे यांचे उद्गार सार्थ ठरले.

