पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता. पंढरपूर मधील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी तथा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवरांची उपस्थिती लाभली.
स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या कार्यक्रमात दीपप्रज्वलन करून, कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात सेजल पारगे यांनी ‘मराठी भाषा गौरव दिना’चे महत्त्व स्पष्ट करताना ‘मराठी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची भाषा असून तिचा गौरव करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.’ असा विचार यावेळी व्यक्त केला. या निमित्ताने लोकगीते, भाषणे, वक्तृत्व स्पर्धा आणि लोककला सादरीकरण यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत कला, कौशल्ये आणि वक्तृत्वगुणांचे प्रभावी प्रदर्शन केले. मराठी भाषेचे वैभव, अभिजात दर्जा तसेच आधुनिक युगातील मराठीचे स्थान यावर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली होती. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मानवतावादी बहुउद्देशीय मंडळाच्या अध्यक्षा प्रा. सुरेखा भालेराव- नागटीळक म्हणाल्या की, ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असून मराठी भाषा जोपासणे व त्यात वाढ करणे ही महाराष्ट्रातील प्रत्येक युवकाची नैतिक जबाबदारी आहे. मराठी भाषेचा विसर पडू नये व भाषा कायमस्वरूपी अमर राहावी यासाठी नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे.’ असे सांगितले.
डॉ. यशपाल खेडकर म्हणाले की, ‘मराठी ही संस्कृती आणि परंपरेची भाषा आहे. यामध्ये संतपरंपरा, हुतात्मे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ही मातृभाषा असून तिला मोठा व गौरवशाली इतिहास लाभला आहे. मराठी भाषेची अस्मिता टिकविण्यासाठी, मराठी भाषेचा सन्मान व संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत.’ असे आवाहन त्यांनी केले. या निमित्ताने घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत अनुक्रमे एलएलबी प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या तेजश्री चंद्रकांत डांगे, प्रसाद शंकर नागटिळक व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात दुसऱ्या वर्षातील ओम अमोल जगताप यांनी बक्षिसे मिळविली. लोककला सादरीकरण स्पर्धेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षातील आदित्य भालचंद्र बनसोडे, एलएलबी प्रथम वर्षाच्या नगमा सिकंदर पटेल व प्राची नामदेव कोळी तर शिक्षक विभागात आयोजिलेल्या लोककला सादरीकरण मध्ये पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रा. पद्मजा सुनील भिंगारे यांनी बक्षीस मिळविले.
याचबरोबर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व प्राध्यापकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड. अर्चना कुलकर्णी, प्रा. पी.एस मोरे, इतर प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन ऋतुजा कोरके यांनी केले तर आभार विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस. मठपती यांनी मानले.


