भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
जय भवानी पाणी वापर संस्था, भाळवणी (ता. पंढरपूर) यांच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर सभामंडप येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हणमंत लोखंडे होते. सभेच्या प्रारंभी उपसरपंच नितीन शिंदे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत प्रास्ताविक केले. त्यानंतर संस्थेचा वार्षिक आर्थिक व कामकाजाचा लेखाजोखा रामचंद्र सावंत यांनी सभेसमोर सादर केला. यावर सभासदांनी सविस्तर चर्चा करून संस्थेच्या भविष्यातील कामकाजासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
सभेत पुढील हंगामापासून प्रति एकर ५०० रुपये पाणीपट्टी आकारणी करण्याचा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेत पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी संस्थेसाठी स्वतंत्र गेजकुंडी बसविण्याचा तसेच शेतकऱ्यांच्या सोयीसाठी संस्थेचे नवीन कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामासाठी पाणी मागणी नोंदविली आहे, त्या शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील पाणी वाटपात प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असे धोरणही सभेत निश्चित करण्यात आले. सभेतील सर्व विषयांवर सखोल चर्चा झाल्यानंतर सर्व ठरावांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलास देठे, उपसरपंच नितीन शिंदे,धोंडीराम शिंदे, डॉ. विजयसिंह गवळी, जयराम शिंदे, बाळासाहेब कापसे, नामदेव शिंदे, गोरख भुजबळ, अमोल लिंगे, अमोल शिंदे, किशोर खरडकर, नानासो शिंदे, महेश मदने, शिवाजी लोखंडे, उमर शेख, अविनाश म्हेत्रे, मुसा शेख, माऊली लोखंडे, सौरभ तारळकर, शफिक शेख, कालवा निरीक्षक विजय राऊत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सर्व कर्मचारी, सभासद आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी सभेचे आभार लुकमान इनामदार यांनी मानले. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे निर्णय झाल्याने उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त केले असून, आगामी हंगामात पाणी व्यवस्थापन अधिक नियोजनबद्ध आणि परिणामकारक होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


