अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस, वारकरी संप्रदायाची अखंड भक्तीपरंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा सुंदर संगम घडवत अकलूज येथील पाच सायकलस्वारांची आळंदी ते पंढरपूर ही पहिलीच भक्तिमय सायकल वारी उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विठूनामाच्या अखंड जयघोषात सायकलवारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत वारीची सांगता केली.
'अकलूज सायकल रायडर्स'च्या वतीने राहुल गायकवाड, महेश राणे, श्रीपाद देशमुख, संजय झंजे आणि बाळासाहेब काशीद या पाच सायकलस्वारांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन नगरी आळंदी येथून वारीला प्रारंभ केला. भर पावसात इंद्रायणी नदीच्या तीरावर विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन आणि "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" अशा जयघोषात या सायकल वारीला सुरुवात झाली.
पारंपरिक वारीच्या भावनेला आधुनिक आणि पर्यावरणपूरक स्वरूप देत या सायकलस्वारांनी सुमारे २४० किलोमीटरचा प्रवास अवघ्या दीड दिवसात पूर्ण केला. संपूर्ण प्रवासादरम्यान नामस्मरण, अभंग, विठ्ठलभक्ती आणि शिस्तबद्ध सायकलिंगचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. मार्गातील अनेक गावांमध्ये ग्रामस्थांनी सायकलवारकऱ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करून अल्पोपहार व चहा पानाची सोय करून स्वागत केले. केले.
या सायकल वारीतून पर्यावरण संरक्षण, नियमित व्यायाम, निरोगी जीवनशैली आणि वारकरी परंपरेचा प्रचार असा दुहेरी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. युवकांनी अशा विधायक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, असा संदेशही सायकलस्वारांनी दिला.
पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन सर्व सायकलवारकऱ्यांनी वारीची सांगता केली. या अनोख्या सायकल वारीमुळे अकलूजच्या सायकलस्वारांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, पुढील वर्षी अधिकाधिक सायकलप्रेमींनी या पर्यावरणपूरक आणि भक्तिमय वारीत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


